| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील एक मोठे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेरळ कळंब रस्त्यावरील डिस्कव्हर रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. मात्र, या रेसॉर्टकडे कोल्हारे ग्रामपंचायतीची तब्बल 44 लाख मालमत्ता कर थकीत आहे.
कोल्हारे ग्रामपंचायत गेली पाच वर्षे केवळ नोटिसा देण्याचे काम करीत असून, ग्रामपंचायतीने ठरवलेली जप्तीची कारवाई ग्रामपंचायत प्रशासन कधी करणार असा प्रश्न एका ग्रामपंचायत सदस्याने उपस्थित केला आहे. दरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून थकीत घरपट्टीसाठी संबंधितांनी नोटिसा बजावण्यात आली आहेत अशी माहिती दिली आहे.
धामोते येथे डिस्कवर नावाचे रिसॉर्ट असून, हे रिसॉर्ट सिल्व्हेस रियाल्टी प्रायव्हेट कंपनीच्या मालकीचे आहे. मागील काही वर्षात हे रिसॉर्ट वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. अशा रिसॉर्टकडे गेली दहा वर्षात लाखोंची घरपट्टी संबंधित कंपनीने थकवली आहे. 2014 पर्यंत या रिसॉर्टकडे साधारण 17 लाखांची घरपट्टी थकीत होती, त्यांनतर 2014 पासून घरपट्टी वसूल करण्याचे अनेक प्रयत्न झाले. तरी देखील आजच्या तारखेला या रिसॉर्ट कंपनीकडे तब्बल 44 लाखांची घरपट्टी थकीत आहे. रीतसर आकारण्यात आलेली घरपट्टी भरावी म्हणून कोल्हारे ग्रामपंचायतीने तगादा लावला आहे. परंतु, संबंधित हॉटेल प्रशासन आणि कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होतांना दिसत नाही. कोल्हारे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांनी थकीत घरपट्टी बद्दल नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. मात्र, जप्तीच्या कारवाई बद्दल कोणतीही माहिती ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून दिली जात नसल्याने थकीत घरपट्टी वसूल होणार का? हा प्रश्न कायम आहे.







