शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मागणीची दखल

महाडमधील वारंवार पुरस्थितीतीवर नियंत्रण आणण्यासाठी
सावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करावी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जलसंपदा विभागाला सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाड शहराला वारंवार पुराचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी सावित्री नदीत तयार झालेली बेटे आणि गाळ काढण्याची प्रक्रिया जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने सुरु करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी 26 जुलै 2021 रोजी जनतेशी संवाद साधून सावित्री नदी पात्रातील गाळ काढून पात्र खोल करावी किंवा महाडचे अन्यत्र पुर्नवसक करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात विधीमंडळात देखील वारंवार जयंत पाटील यांनी चर्चा केली होती. त्यानुसार राज्य शासनाने दखल घेत उपाययोजना करण्याबाबतचा निर्णय घेतल्याबाबत जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त करीत धन्यवाद दिले आहेत.
याच बैठकीत अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका महाड शहरातील छोटे व्यावसायिक, दुकानदारांसह व्यापारांना बसला होता. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने मदत देण्यात येत आहे. या नुकसानग्रस्तांना मदतीसह इतर योजनांचा लाभ देताना शॉपक्ट परवान्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील इतर व्यावसायिक पुरावे ग्राह्य धरण्याचा महत्वपूर्ण निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
महाड शहरातील पूर निवारणासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाड शहराला अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या पूरस्थितीचा वारंवार फटका बसतो, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातून वाहणार्‍या सावित्री नदीत तयार झालेली बेटे आणि गाळ काढणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. तसेच यावर्षी झालेल्या पूरस्थितीमुळे महाड शहरातील अनेक छोटे व्यवसायिक, दुकानदार, टपरीधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने त्यांना मदत देण्यात येत आहे. नुकसानग्रस्त दुकानदार, छोटे व्यवसायिक, टपरीधारकांना मदत आणि इतर सवलती देताना शॉपक्ट परवान्याव्यतिरिक्त इतर व्यवसायिक पुरावे ग्राह्य धरण्याचा तसेच सावित्री नदीवरील दादली आणि गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

काय म्हणाले होते आ. जयंत पाटील
मी अनेकवेळा विधी मंडळामध्ये देखील वारंवार बोललो की सावित्री नदीचे जे पात्र आहे, ते खोल करण्याची गरज आहे. तेथली रेती काढण्याची परवानगी देऊन ते खोल करुन त्याला संरक्षक भिंत बांधली पहिजे. किंवा मग महाड शहराचे पुनर्वसन तरी केले पाहिजे.
हे दरवर्षी पूरबळी, पाणी घुसून नुकसान होणार हे थांबविले पाहिजे. महाडमध्ये खास बाब म्हणून केंद्र सरकारसोबत महाड उठवून नवीन ठिकाणी वसविले पाहिजे. यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. दरवर्षी तेच तेच चर्चा होते. महाड मध्ये पुर येत नाही असा कुठलाच पावसाळा गेला नाही. यावेळी मोठया भयंकर प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले होते.

Exit mobile version