| मुंबई | प्रतिनिधी |
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या विधानपरिषदेच्या नेत्या नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया यांना अपात्रतेची नोटीस महाविकास आघाडीच्या आमदारांकडून पाठवण्यात आली आहे. गोऱ्हे या उपसभापती असल्यानं त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र व्हावं लागेल. तसेच, कायंदे यांच्यावरही लोकप्रतिनिधी कायद्याच्या 10 शेड्युल प्रमाणं अपात्र व्हावं लागेल, असं शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सांगितलं.
नीलम गोऱ्हेंवर अपात्रतेबाबत कायदेशीर बाजू सांगताना परब म्हणाले, काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. त्यामुळं कायद्यानुसार, दहाव्या शेड्युलमध्ये 2 अ नुसार जी अपात्रतेची तरतूद आहे, त्याअंतर्गत आम्ही त्यांच्यावर अपत्रतेची नोटीत दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही सगळी प्रकरण अध्यक्षांकडं पाठवलेली आहेत. सध्या विधानपरिषदेत सभापती नाहीत त्याजागी उपसभापती काम बघणार आहेत. पण उपसभापतींवरच अपात्रतेचा ठराव आहे, म्हणून आम्ही त्यांना रिमुव्हल नोटीसही दिली आहे.