पाट पूजन करून लक्षवेधक आंदोलन
| पनवेल | प्रतिनिधी |
मुंबई- गोवा महामार्गाच्या गेल्या 15 वर्षातील रखडलेल्या रस्ते कामाविरोधात बळीराजा सेना आणि जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पनवेल येथील पळस्पे फाटा येथे गणपतीच्या पाटाचे विधिवत पूजन करून लक्षवेधक आंदोलन केले. धोकादायक महामार्गाचा अवलंब टाळावा, या सरकारला जाग यावी म्हणून कोकणात जाणाऱ्या महामार्गावर लांजा ते पनवेल या ठिकाणी दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानालगत गणेशमूर्तींची स्थापना करून सरकारचे लक्ष वेधले जाणार असल्याची घोषणा संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रविवारी आंदोलन ठिकाणी केली.
गेल्या 15 वर्षात 4531 जणांनी मुंबई- गोवा महामार्गावर विविध अपघातांमध्ये आपले प्राण गमावले. सरकारने 700 किलोमीटरचा समुद्धी महामार्गाचे काम अवघ्या पाच वर्षात पूर्ण केले. मात्र, मुंबई- गोवा महामार्गाचे 471 किलोमीटरचे काम 16 वर्षे रखडल्याने बळीराजा सेना आणि जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी पळस्पे येथील आंदोलनातून संताप व्यक्त केला. महामार्गाच्या कामात भूसंपादनाचा अडथळा येत असल्याचे कारण पुढे करून कोकणाला बदनाम केले जात आहे. प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी मंत्र्यांचे दौरे या महामार्गाच्या पाहणीसाठी केले जातात. मात्र, हा निव्वळ दिखावा असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. कोकणात जाण्यासाठी पूर्वीचे अरुंद महामार्ग सूरक्षित होता. मात्र, काँक्रीटचा महामार्गावर अनेकांचा बळी गेल्याने या सरकारला पथकर वसुली आणि कंत्राटदारांची चिंता लागली आहे.
सरकारने या महामार्गावर रस्ते अपघातामधील मृतांच्या वारसदारांना सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी रविवारी आंदोलकांनी केली. हा महामार्ग सुरक्षित वापरता येईल असा बांधावा अशी अपेक्षा यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. रस्ते बांधणारे अधिकारी, कंत्राटदार आणि सरकारमधील काही राज्यकर्त्यांच्या संगनमतामुळे या महामार्गाचे काम अपुर्ण राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जन आक्रोश समितीचे अजय यादव आणि विदेश कदम यांनी सुद्धा 15 वर्षे रखडलेल्या या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण केल्यानंतर सागरी किनारा महामार्ग, द्रुतगती महामार्ग यांसारख्या प्रकल्पांची कामे सुरूवात करा अशी मागणी यावेळी केली.
प्रत्येक पक्षातील नेते आणि ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने कोकणाला महत्वाचा असणारा हा महामार्ग रखडला आहे. साडेचार हजारांचा बळी या महामार्गावर गेला तरी या सरकारला जाग येत नाही. सरकार आणि ठेकेदार यांच्याकडून या महामार्गातील अपघाती बळी नव्हेतर हे त्यांच्या संगनमतातून होत असलेल्या हत्या आहेत. यापुढे अशा हत्या घडू नयेत, अशी विनवणी वजा साकडे ओदांलनकर्त्यांनी गणरायाला घातले.





