आता मार्करऐवजी काडीने लावणार शाई

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोगाचा निर्णय; विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईसह राज्यभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या आरोपानंतर जोरदार राजकीय गदारोळ पसरला आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी हे आरोप पूर्णतः निराधार असून, जनतेमध्ये मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, ‌‘मार्कर पेनचा अनुभव पाहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा वापर करणार आहोत.’ अशी घोषणा दिनेश वाघमारे यांनी गुरुवार, दि. 15 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यामुळे आता 5 फेब्रुवारीला मार्करऐवजी काडीने बोटाला शाई लावली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोग 2011 पासून मार्कर पेनद्वारे शाईचा वापर करत आहे. ही शाई बोटावर लावल्यानंतर 10 ते 12 सेकंदांत सुकते आणि एकदा सुकल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे पुसता येत नाही, असा ठाम दावा आयुक्त वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. “ही शाई वेगळी नसून, भारतीय निवडणूक आयोग लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये वापरतो, तीच शाई आहे. मतदार मतदान केल्यानंतर एवढा वेळ मतदान केंद्रातच असतो. त्यामुळे शाई पुसली जाण्याची शक्यताच नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाई पुसली जात असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आयुक्त वाघमारे स्वतः माध्यमांसमोर आले आणि आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे ठामपणे सांगितले. नेलपेंट रिमूव्हर, सॅनिटायझरच्या आरोपांनाही नकार शाई नेलपेंट रिमूव्हर किंवा सॅनिटायझरने पुसली जात असल्याच्या तक्रारींवरही आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला. “आमच्या कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. एकाही व्यक्तीची शाई पुसली गेलेली नाही. आम्ही कोरस कंपनीचे मार्कर पेन अनेक वर्षांपासून वापरत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version