भारतीय संघांच्या आशा पल्लवित
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाला जागितक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाची स्वप्न पडू लागली होती. मागील दोन पर्वात भारताला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचा दुष्काळ यंदा संपेल, असे वाटत होते. परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा पराभवाने सर्व गणित बिघडले आहे. आता भारताला अगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाला 4-0 असे पराभूत करावे लागणार आहे, तरच भारत डब्लूटीसीचा अंतिम सामना खेळू शकणार आहे. यामुळे आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर बांगलादेशला व्हाईट वॉश दिला आणि कसोटी गुणतालिकेत अव्वल स्थान बळकट केले होते. पण, न्यूझीलंडविरुद्धच्या 3-0 अशा पराभवाने भारताला 74 हून थेट 58.33 टक्क्यांवर यावे लागले. यावेळी भारत प्रथमच घरच्या मैदानावर मालिका हरला आहे. यामुळे आता भारताला ऑस्ट्रेलिया दौर्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 4-0 असा विजय मिळवावा लागणार आहे. भारताने बॉर्डर गावस्कर मालिका 2-3 अशी गमावल्यानंतरही त्यांचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा खेळण्याचा मार्ग खुला राहणार आहे. भारताने ही मालिका 2-3 अशी गमावल्यास त्यांची टक्केवारी 53.51 अशी राहिल. यानंतरही ते दुसर्या स्थानावर कायम राहतील. अशा वेळी त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागणार आहे.
बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ पुढील महिन्यात न्यूझीलंड दौर्यावर आहे. इंग्लंड-न्यूझीलंड मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली तरी भारताचाच फायदा आहे. या निकालमुळे न्यूझीलंड जास्तीत जास्त 52.38 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातली दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यासही भारताला फायदा होणार आहे. श्रीलंका (55.56) आणि आफ्रिका (54.17) हेही अंतिम सामन्याच्या शर्यतीत आहेत. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दोन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटणेही भारतासाठी महत्त्वाचे आहे. तसेच, बॉर्डर गावस्कर चषकानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौर्यावर जाण्णार आहे. भारताला जर अंतिम सामना खेळायचा असेल तर ही मालिका 0-0 अशी अनिर्णीत राहणे गरजेचे आहे. जरी ऑस्ट्रेलियाने ही मालिका जिंकली तरी भारत अंतिम सामा खेळू शकतो.