भाजपच्या ओझ्याखाली दबलेले अनंत गीते झाले वैफल्यग्रस्त- खा. सुनिल तटकरे

। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यानिमित्ताने रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना वाद, राजकीय वैर पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्याचं दिसत आहे. गिते यांच्या या वक्तव्यावर आता सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे म्हणाले, भाजपाच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकांच्या ओझ्याखाली दबलेल्या अनंत गीतेंचा स्वाभिमान त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची वक्तव्यं करण्यात आली तेव्हा तो गळून पडला होता. अलीकडच्या काळात गीते यांची राजकीय अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यामुळे अशा भावनेतून त्यांचे हे वैफल्यग्रस्त उद्गार आले आहेत, असं मला जाणवत आहे. म्हणून ते बोलल्याने काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारला देशपातळीवर नावाजलं जात आहे. त्यामुळे अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचे भान राहिलं नसेल. म्हणून त्या नैराश्यापोटी आलेली ती वक्तव्यं असू शकतील.

काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं होतं.

Exit mobile version