माजी आ. पंडित पाटील यांनी लगावला टोला
| माणगाव | वार्ताहर |
माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधार्यांच्या विरोधात माणगाव विकास आघाडीने 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवित जनाधार मिळविला आहे. त्यामुळे आता पुढील काळात नगरपंचायतीचा कारभार सुतारवाडीतून नव्हे, तर माणगाव नगरपंचायतीतून चालणार असल्याचा टोला शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या 10 फेब्रुवारीला होत असून, या नगराध्यक्षपदासाठी माणगाव विकास आघाडीचे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक ज्ञानदेव पवार यांनी शुक्रवार, दि.4 फेब्रुवारी रोजी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. त्यानंतर शनिवार, दि.5 फेब्रुवारी रोजी दुपारी पंडित पाटील यांनी माणगाव येथे ज्ञानदेव पवार यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना नगराध्यक्षपदाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना पंडित पाटील यांनी आपली प्रतिक्रया व्यक्त केली.
यावेळी अॅड. राजीव साबळे, दक्षिण रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, मोर्बा येथील शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लमभाई राऊत, शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे, माजी नगरसेविका अंजली पवार, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे, विरेश येरुणकर आदींसह महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी शेकापचे योगदान आहे. तसेच स्व. प्रभाकर पाटील, माजी आमदार स्व. अशोकदादा साबळे यांचेही मोठे योगदान आहे. आजही माणगावचे नाव अशोकदादा साबळे यांच्या नावाने निघत आहे. माणगावच्या विकासासाठी त्यांची विशेष तळमळ होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र व माझे एकवेळचे जिल्हा परिषदेतील सहकारी अॅड. राजीव साबळे हे काम करीत आहेत. अॅड. साबळे यांना प्रशासनाचा भरपूर अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा होणारे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी घ्यावा. शेवटी माणगाव विकास आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांना शुभेच्छा दिल्या.
माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शेवटच्या फेरीत अॅड. साबळे यांनी विजयी चौकार मारला. आता माणगावमधील नगरपंचायतीच्या या यशामुळे येणार्या काळात दक्षिण रायगडातील राजकीय समीकरणे बदलल्याशिवाय राहणार नाही, याचा मला ठाम विश्वास आहे. – पंडित पाटील, शेकाप नेते







