एजंटगिरीला लागणार लगाम

थेट मालकांनीच कामासाठी येण्याचे आदेश

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील जमिनीचे व्यवहार होण्यासाठी अथवा करण्यासाठी स्थानिक मध्यस्थाची मदत घेतली जाते. तसेच मोजणी करण्यासाठी वारंवार कर्जतला येऊ शकत नसल्याने जमीन खरेदी करणारे हे आपली कामे एजंटकडे सोपवत असतात. याला आळा घालण्यासाठी जमीन मालकांनीच थेट चलन भरून समक्ष मोजणी करून घ्यावी, असा निर्देश भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन आटाळे यांनी काढला आहे.

कर्जतमध्ये जमिनीची देवाणघेवाण ही सतत होत असते. त्यामुळे येथील भूमी अभिलेख कार्यालय हे लाच घेण्याचे ठिकाण बनले होते. परिणामी, अनेक कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. जमीन खरेदीचे आर्थिक व्यवहार करणारे हे अन्य जिल्ह्याचे आर्थिक सक्षम असलेले धनाढ्य आहेत. प्रत्येक कागदपत्रांसाठी किंवा कामांसाठी मुंबई, वाशी अथवा पुण्यावरून ये-जा करू शकत नसल्याने हे धनाढ्य एजंटकडे काम सोपवितात आणि त्याचा चांगल्या प्रकारे आर्थिक मोबदलाही घेतात. यामुळे भूमी अभिलेखमधील आलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील जादा रक्कम देऊन अजून आमिष दाखवून काम करून घेतात. त्यामुळे जे गोरगरीब रीतसर चलन भरून तीन-सहा महिन्यांच्या तारखेपर्यंत थांबतात, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे नितीन आटाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी हे सर्व रोखण्यासाठी एजेंटद्वारे येणारे काम बंद केले. थेट मालक आले पाहिजे असे आदेश काढले आहे. तसेच लाचखोरीमध्ये कर्मचारी अडकले गेल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली होती. यासाठी त्यांनी शासनाकडून जादा कर्मचारी देण्याची केलेली मागणी मान्य झाली असून, लवकरच नियुक्ती होणार आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर मोजणीची काम हाती घेऊन लवकर मार्गी लावणार असल्याचे नितीन आटाळे यांनी सांगितले आहे.

निगराणीसाठी सीसीटीव्ही
कार्यालयात वेळेवर कर्मचारी येतात की नाही आणि एजंट कोण कोण येतात यावर निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महिनाभरात बसविण्यात येणार असल्याचे आटाळे यांनी सांगितले. तसेच एवढे करून ही जर कोणी काही चूक केली तर त्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केली जाणार असल्याचेही नमूद केले. यामुळे नक्कीच एजंटवर चाप बसला जाणार आहे.

सर्व शेतकऱ्यांच्या आणि बिनशेती जमिनीची मोजणी केली जाईल. पण, प्रत्यक्षात जी व्यक्ती जमिनीचे मालक आहेत त्यांनीच जमीन मोजणीसाची रक्कम भरून रीतसर मोजणी करण्याची प्रचलित पद्धत अवलंबवावी आणि मोजणी करून घ्यावी. एजंटांचा वावर रोखण्यासाठी कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

नितीन आटाळे, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, कर्जत
Exit mobile version