आता शेतकर्‍यांचा संयम सुटला; आता रिलायन्स गॅस पाईपलाईन उखडणारच!

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस पाइपलाईन प्रकल्पबाधीत शेतकरी 2018 पासून कंपनी, सक्षम अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि शासकीय स्तरावर विविध मार्गानी आपल्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करत आहेत. अनेकवेळा पत्रव्यवहार, बैठका, आंदोलने आणि उपोषण करूनही आजपर्यत कंपनीने ठरलेला मोबदला दिलेला नाही. फक्त आश्‍वासने आणि वेळ काढूपणाची भूमिका घेत हा विषय प्रलंबित ठेवून शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध फुटला असून मोबदला देणार नसाल तर आमच्या जमिनीत तुमची लाईनही नको, अशी कठोर भूमिका घेतल्याचा इशारा पत्राद्वारे रिलायन्स, सक्षम अधिकारी, जिल्हाप्रशासन आणि मुख्यमंत्री कार्यालयाला दिला आहे.

कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापूर, गणेगाव, कडाव, कर्जत यासह ठाणे जिल्हयातील शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी उपोषण केले. अनेकवेळा पत्रव्यवहार केला. रिलायन्स आणि दलाल यांनी शेतकर्‍यांची खुप मोठी फसवणुक करून प्रकल्पाचे काम पुर्ण केले आणि मग मोबदला देण्याबाबत टाळाटाळ केली. अनेकवेळा बैठका झाल्या. पंरतू निर्णय शुन्य अशी स्थिती असताना शेतकर्‍यांनी अजून किती दिवस वाट पाहायची? एकीकडे या प्रकल्पामुळे पिक घेता आले नाही तर दुसरीकडे निसर्गानेही शेतकर्‍यांकडे पाठ फिरवत पिकांचे नुकसान केले. अशा स्थितीत दिन दुबळ्या शेतकर्‍यांनी आपला उदरनिर्वाह तरी कसा करायचा, हा प्रश्‍न भेडसावत आहे.

तसेच या जमिनी अधिग्रहण करताना अनेक गैरव्यवहार झाले असून शेतकरी नसलेल्या किंवा ज्यांचा या प्रकल्पाशी दुरान्वये संबंध नाही, अशा अनेकांना रिलायन्सने आर्थिक लाभ दिला आणि ज्या गरीब शेतकर्‍यांच्या या प्रकल्पात जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या त्यांना मात्र कवडीमोल मोबदला देत त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. खोटे पंचनामे, पेमेंट स्थगिती, पोलिसी बळाचा वापर करून जबरदस्ती पाईपलाईन टाकण्याचे काम रिलायन्सने केले आहे या सर्वांचा उद्रेक आता झाल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी दिला आहे.


आमचा लढा कशासाठी ?
प्रकल्पात गेलेल्या आमच्या जमिनीच्या 7/12 वरील नोंदीनुसार नुकसान भरपाईचा मोबदला त्वरीत मिळावा.
2018 पासून ते आतापर्यत पीक नुकसान भरपाई देण्यात यावी.
कंपनीने शेतकर्‍यांना कबूल केलेला मोबदला पुर्णपणे द्यावा. तसेच ज्या शेतकर्‍यांना धनादेश देऊन नंतर ते थांबविण्यात आले त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा.
खोटे पंचनामे केलेल्या रिलायन्स अधिकारी आणि दलालांची गुन्हे अन्वेषण खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी.
मोबदला नाही तर आमच्या शेतात लाईनही नाही.

Exit mobile version