सात विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड.. नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी.. यामुळे रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील वातावरण ढवळून निघाले होते.. अशा सर्व गोंधळात अखेर सोमवारी (दि. 4) अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे. जिल्ह्यातील 38 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून, 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात सुमारे पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या छाननीमध्ये 94 उमेदवार वैध ठरले आहेत. त्यामध्ये पनवेल विधानसभा मतदारसंघात 15, कर्जतमध्ये 12, उरणमध्ये 16, पेणमध्यध्ये 12, अलिबागमध्ये 22 व श्रीवर्धनमध्ये 12 तसेच महाडमध्ये पाच उमेदवार वैध ठरले आहेत. सोमवारी (दि. 4) अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत पार पडली. आता 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड या सात विधानसभा मतदारसंघात 24 लाख 88 हजार 788 मतदार असून, जिल्ह्यातील दोन हजार 790 केंद्रांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदानाचा हक्क मतदार बजावणार आहेत. त्यामध्ये युवा, महिला व 85 वर्षांवरील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यंदा मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. यावर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यात आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 55 हजार 893 मतदार, 85 वर्षांपुढील 35 हजार 863, दिव्यांग 13 हजार 191 तसेच अनिवासी भारतीय 233 मतदार आहेत. जिल्ह्यातील पेण व रोहा या ठिकाणी एकूण 10 संवेदनशील केंद्र आहेत. 49 मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
मतदान केंद्रावर असणार सुविधा
जिल्ह्यात बॅलेट युनिट सहा हजार 200, कंट्रोल युनिट तीन हजार 405 व व्हीव्ही पॅट तीन हजार 681 अशा एकूण 13 हजार 286 मशीन असून, 17 हजार 2496 कर्मचार्यांचे नियोजन केले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. मतदान केंद्राची पाहणी केली जाणार असून, जिल्ह्यातील मतदारसंघांत बॅलेट युनिट, व्हीव्ही पॅट मशीन देण्यात आले असून, स्ट्राँग रुममध्ये ते ठेवण्यात आले असल्याचे जावळे यांनी सांगितले.