आता तलाठ्यांना द्यावे लागणार वेळापत्रक

नागरिकांची धावाधाव थांबणार

| रायगड | प्रतिनिधी |

गावपातळीवर नागरिकांच्या जमिनींचा आणि पिकांचा हिशेब ठेवणाऱ्या तलाठ्यांना आता त्याच्या उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामस्तरावर द्यावे लागणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात तलाठी कधी उपस्थित राहणार, याचा आठवड्याचा तक्ता लावण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत. परिणामी आपल्या गावात तलाठी कधी येणार, त्याचे विविध कार्यक्रम व दौरा काय असेल याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळणार आहे. तलाठी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आणि सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा आदेश पारित करण्यात आला आहे. आता वेळापत्रकाबरोबरच तलाठ्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल, अशा स्वरूपात लावण्यासही सांगण्यात आले आहे.

संबंधित वेळापत्रक मंडल अधिकारी व नायब तहसीलदार यांनाही पाठविण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सज्जातील गावांना भेटी देणे, पंचनामे, स्थळ पाहणे, वरिष्ठ कार्यालयांमध्ये असणाऱ्या बैठका, तपासण्या अशी अनेक कामे तलाठ्यांकडे असतात. सध्या एका तलाठ्याकडे एकापेक्षा जास्त सज्जाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. अनेकदा मुख्य कार्यालयांमध्ये तलाठ्यांना उपस्थित राहता येत नाही. परिणामी, नागरिकांची गैरसोय होते.अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.

जिल्ह्यासाठी 510 तलाठी पदे मंजूर आहेत, मात्र सध्या 253 तलाठी कार्यरत असून, 257 पदे रिकामी आहेत. भरती प्रक्रिया सुरू असून, ही पदे भरली जाण्यास उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी जाईल. त्या दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महसूल विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

Exit mobile version