आता भातकापणीची चिंता नाही

स्थानिक शेतकर्‍याने केली रिपर यंत्राची निर्मिती; मजुरांच्या समस्येवर रामबाण उपाय

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जाणारे आणि भाताच्या उत्पादनात राज्यस्तरीय विक्रम करणारे शेतकर्‍याने आपल्या शेतातील भाताची कापणी रिपर यंत्राने केली आहे. या यंत्राची निर्मिती स्थानिक शेतकरी नैनेश दळवी आणि निलिकेश दळवी या बंधूंनी केली आहे. मजुरांची समस्या दूर करण्यात हे रिपर यंत्र यशस्वी ठरले असून, दिवसाला तीन ते चार एकर जमिनीमधील भाताची कापणी हे यंत्र करते.

तालुक्यातील वदप येथील प्रगतशील शेतकरी विनय वेखंडे यांनी आपल्या शेतातील भाताची कापणी ही रिपर यंत्राने केली. या यंत्राची निर्मती याच भागातील प्रगत शेतकरी दळवी बंधू यांनी केली आहे. कर्जतमधील राजनाला कालव्याच्या पाण्यावर दुबार शेतीचे मोठ्या प्रमाणात भाताचे सुपीक घेणारे शेतकरी म्हणून विनय वेखंडे यांची ओळख आहे. त्यांना भाताची कापणी करण्यासाठी मजुरांची समस्या भेडसावत होती. त्यामुळे त्यांनी अशावेळी रिपर कापणी यंत्राचा वापर केला आणि आपल्या शेतातील भाताची कापणी पूर्ण केली. भात कापणी यंत्र रिपरचा वापर जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कर्जत दिनेश कोळी यांनी केले. वेखंडे यांनी सलग पाच सहा दिवस रिपर यंत्राचा वापर करून आपल्या शेतातील भाताच्या पिकाची कंपनी करून घेतली आहे. त्याचवेळी भात मळणी यंत्र कृषी विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.

रिपर हे कोणत्याही पावर टिलरला जोडता येते. या अवजारासाठी कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प अत्यल्प व महिला शेतकर्‍यांसाठी 50 टक्के अनुदान देय आहे व इतर शेतकर्‍यांसाठी 40 टक्के अनुदान देय आहे. तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ऑनलाइन करून या योजनेचा लाभ घ्यावा.

दिनेश कोळी,
मंडळ कृषी अधिकारी
Exit mobile version