वाहनचालक, नागरिक व प्रवासी हैराण
| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील विविध भागांत रस्त्यांवर उनाड गुरांचा वावर वाढल्याने वाहनचालक, नागरिक आणि प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. या गुरांमुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असून, संबंधित प्रशासन ठोस कारवाई कधी करणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गोकुळाष्टमी, गौरी-गणपतीसारखे सण तोंडावर आल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येत आहेत. अशा वेळी ताराबंदर, काशिद, नांदगाव, मजगाव, विहूर, मुरुड पेरेननाका, एकदरा पूल, आगरदांडा आदी भागांतील रस्त्यांवर उनाड गुरांमुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुरे अचानक रस्त्यावर आल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या असून, भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उनाड गुरांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित शासकीय विभाग, नगरपालिका व ग्रामपंचायतींनी तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक, नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.
