परिचारिका फसवणूक प्रकरण; 1.32 कोटी परत

आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 100 परिचारकांना नोकरीत कायम करतो, असे सांगत त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी याबाबत विधिमंडळात आवाज उठवून फसवणूक करणार्‍या कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसी दणका मिळताच त्या कर्मचार्‍याने 48 जणींचे पावणेदोन लाख रुपयांप्रमाणे 1 कोटी 32 लाख रुपये परत केले. आ. जयंत पाटील यांच्या पुढाकाराने पैसे परत मिळाल्याने परिचारिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.

सूरज पवार असे फसवणूक करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव आहे. हा कर्मचारी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारित येणार्‍या मुरूड येथील उपजिल्हा रुग्णालयात ब्रदर म्हणून काम करतो. जिल्ह्यातील अलिबागसह अन्य रुग्णालयात काम करणार्‍या कंत्राटी परिचारिकांचा विश्‍वास संपादन करून सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन सूरज पवार याने दिले. त्यासाठी त्याने सुमारे 80 पेक्षा अधिक परिचारिकांकडून पावणेदोन लाख रुपये घेतले. मात्र, गेली तीन वर्षे उलटूनदेखील त्या परिचारिकांना सेवेत कायम केले नाही. त्यात पैसेही परत दिले नाही. त्यामुळे परिचारिका व त्यांच्या पालकांकडून वारंवार विचारणा होऊ लागली. परंतु, सूरज पवार उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यामुळे परिचारिकांनी दिलेले पैसे परत करण्यास सांगितले असता तो पैसे देण्यास टाळाटाळ करु लागला. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे परिचारिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब अलिबाग नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांच्या लक्षात आणून दिली. अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. आ. जयंत पाटील यांनी विधिमंडळात याबाबत आवाज उठवून सूरज पवार या कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरविली. दरम्यान, पोलिसी दणका मिळाल्यावर सूरज पवार याने परिचारिकांचे पैसे देण्याचे कबूल केले. त्यानुसार 48 परिचारिकांचे पैसे परत करण्यात आले आहे.

परिचारिकांची फसवणूक करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्यासह पोलीस निरीक्षक जाधव यांनी योग्य पद्धतीने तपास केला. 48 परिचारिकांना त्यांची रक्कम मिळाली. अन्य परिचारिकांचे पैसे मिळणे बाकी असून, हा तपास चालूच राहणार आहे.

अ‍ॅड. मानसी म्हात्रे

आ. जयंत पाटील यांच्यामुळे फसवूणक झालेल्या मुलींना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला आहे. विधिमंडळात आवाज उठवून सरकारला याबाबत कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याने आज अनेक मुलींचे पैसे परत मिळाले आहेत. कर्ज काढून पैसे भरलेल्या अनेकींचे संसारही वाचले आहेत. याबद्दल आ. जयंत पाटील यांचे पुनश्‍च आभार व्यक्त करतो.

सुरेश खडपे, पालक

आम्हाला कायम करण्यासाठी सूरज पवार यांनी पावणेदोन लाख रुपये घेतले होते. नोकरीत कायम केले नाही. पैसेही दिले नाही. आ. जयंत पाटील, अ‍ॅड. मानसी म्हात्रे व पोलिसांमुळे आम्हाला आमचे थकलेले पैसे मिळाले.

आकाश सावंत, ब्रदर

फसवणूकप्रकरणी तपास सुरू असून, ज्यांची फसवणूक झालीय, त्यांचा जबाब घेतला आहे. काही मुलांचे पैसे परत दिले आहेत. परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.

दत्तात्रय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक
अलिबाग पोलीस ठाणे
Exit mobile version