पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे रोपवाटिकाधारक चिंतातूर

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी आता कुठे रोपवाटिकाधारकांचा व्यवसाय बहरत होता. मात्र, सध्या जिल्ह्यातील तापमानात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. शिवाय पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. यामुळे येथील रोपवाटिकांची होरपळ होत आहे. रोपे वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. शिवाय, विक्रीदेखील घटली आहे. परिणामी, नुकसान होत असल्याने रोपवाटिकाधारक चिंतेत आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रोपवाटिका व्यवसाय चांगला बहरला आहे. येथून वर्षाला काही कोटींचा व्यवसाय होतो. आपल्या शेतात, फळफुल बागांत आणि परसबागेत लावण्यासाठी अनेक जण या रोपवाटिकांमधून रोपे व लॉन खरेदी करतात. मात्र, जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. तलाव, कूपनलिका, नैसर्गिक व कृत्रिम पाणीसाठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, आपल्या रोपवाटिकेतील रोपांना पाणी उपलब्ध करून देताना रोपवाटिकाधारकांची खूप धावपळ होत आहे. प्रचंड उष्मा व पाण्याच्या कमतरतेमुळे रोपे कोमेजून गेली आहेत.
सध्या वाढत्या उष्म्यात रोपांना जगविणे खूप अवघड होऊन जात आहे. अनेक रोपवाटिका धारक आपल्या रोपवाटिकेत पाण्याची व्यवस्था करतात मात्र वाढत्या गर्मीमुळे झाडांना अधिक पाणी लागते. काही वेळेला टँकरने विकतचे पाणी आणावे लागते. मुबलक पाणी मिळाले नाहीतर रोपे कोमेजतात किंवा मरतात. त्यामुळे रोपांच्या अतिरिक्त पाण्याची मागणी पाण्याची कमतरता असल्याने भागविता येत नाही. आणि अशावेळी रोपवाटिकाधारकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काही वेळेला अधिकचे पाणी देण्यासाठी व झाडांची निगा राखण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे लागते. रोपांवर ग्रीननेट किंवा कापडी छत लावावे लागते. अशा प्रकारे रोपांच्या देखभालीसाठी अधिक पैसे व श्रमदेखील द्यावे लागते. त्यामुळे हा व्यवसाय आता खूप मोठ्या संकटात सापडला आहे.
कोट

पाण्याची कमतरता व वाढती गर्मी यामुळे रोपे जगविणे व टिकविणे खूप अवघड होत आहे. अशा कारणांनी उन्हाळ्यात जास्त नवीन माल आणत नाही. मात्र उपलब्ध रोपे जगविणे आवश्यक असते. पाणी जास्त लागल्यामुळे वेळ आणि खर्च अधिक होतो. कोरोनामुळे मागील दोन वर्षे व्यवसाय ठप्प होता. आणि आता वाढत्या उष्म्याने पुन्हा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

अमित निंबाळकर

Exit mobile version