पोषण महिना अभियान

लोकसहभागात रायगड प्रथम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारतर्फे सप्टेंबर 2021 मध्ये पोषण महिना अभियान राबविण्यात आला होता. राज्यात लोकसहभागामध्ये रायगड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले असून या कामगिरीबद्दल मंगळवार (दि 8 मार्च रोजी) महिला दिनानिमित्त राज्य शासनातर्फे मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रायगड जिल्हा प्रशासनास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालविकास मंत्री ड. यशोमती ठाकूर, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव आय.ए. कुंदन, आयुक्त रुबल आग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

रायगड जिल्ह्यातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी तथा पोषण अभियान अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी पुरस्कार स्वीकारला. पोषण महिना अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. महिन्याभरात जिल्ह्यात 27 लाख 44 हजार 876 उपक्रम राबविण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत या उपक्रमासाठी लोकसहभाग लाभल्याने, लोकसहभागात रायगड जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे, या शब्दात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version