ओबीसी-मराठा समाजासाठी एकत्र
| नेरळ | वार्ताहर |
आरक्षणावर अन्य कोणाचेही अतिक्रमण नको, असा निर्धार तालुक्यातील कर्जत ओबीसी संघटनेना केला आहे. ओबीसी संघटनेची एक संयुक्त बैठक कर्जत येथे पार पडली. दोन समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक वातावरण दूषीत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले.
तालुका आगरी समाज संघटनेने पुढाकार घेत दि.23 रोजी सदरची बैठक बोलवली होती. सभेत तालुक्यातील ओबीसी समाजातील विविध जातीचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून कर्जत तालुका आगरी समाज संघटना अध्यक्ष सुरेश टोकरे होते, तर या संयुक्त सभेला भटक्या विमुक्त जातीचे राष्ट्रीय पदाधिकारी भगवान चव्हाण, तसेच सावळाराम जाधव, वसंत कोळंबे, भगवान चव्हाण, अनिल जोशी, दिलीप शिंदे, मनोज मानकमे, केतन पोतदार, सुशांत बदले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात सुरु असलेल्या आरक्षणबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली. तालुक्यात ओबीसी परिषद आयोजित करण्याची सूचना केली, तर ओबीसीमधील सर्व जातींची जनगणना व्हावी, अशी देखील मागणी करण्यात आली. तालुक्यातील ओबीसी समाजातील सर्व जातींच्या संघटनांनी अशा बैठका घेवून सर्व ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचना केली. तालुक्यातील ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी एका व्यक्तीचे नाव निश्चित करण्यात यावेत अशी सूचना केली.
भटक्या विमुक्त मोर्चाचे राष्ट्रीय सचिव भगवान चव्हाण यांनी यावेळी मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, असे आवाहन सरकारला केले. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये समाविष्ट असून त्यांना आमचा विरोध नाही, पण जे कुणबी नाहीत. त्यांना कोणत्या कायद्याने तुम्ही आरक्षण मागता, असा सवाल चव्हाण यांनी केला. बहुजन समाजाने आपल्यातील मतभेद दूर करून एकत्र यायला हवे. देशात सुरू असलेले षडयंत्र उधळून लावण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत वसंत कोळंबे यांनी आरक्षण विषयावर सखोल मार्गदर्शन केले आणि आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे असे मत मांडले.
आपल्या मागण्यांचे निवेदन शासनानाला देण्याची सूचना पत्रकार तथा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे संचालक संतोष पेरणे यांनी या बैठकीत सर्व ओबीसी नेत्यांना केली. मराठा आणि आगरी समाज हे कर्जत तालुक्यातील मोठे समाज असून प्रामुख्याने या समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावर दुही निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पेरणे यांनी केले.