‘आघाडी’च्या ‘हेराफेरी’मुळे ओबीसी आरक्षण रद्द

अ‍ॅड. आशिष शेलार यांचा आरोप
नागपूर I प्रतिनिधी I

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप भाजप नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी शुक्रवारी नागपुरातील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केलेत.

यासंदर्भात अ‍ॅड. शेलार म्हणाले की, भाजपच्या शासन काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण लागू करण्याचा अध्यादेश काढला होता. परंतु, महाविकास आघाडीच्या काळात सदर अध्यादेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तो व्यपगत करण्यात आला. तसेच ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे याचिकाकर्ते विकास गवळी आणि रमेश डोंगरे हे काँग्रेसशी संबंधीत असल्याचे शेलार यांनी सांगितले.

रमेश डोंगरे हे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असून गवळी वाशिमच्या माजी आमदाराचे सुपुत्र असल्याचे शेलार यांनी सांगितले. यावेळी शेलार यांनी पटोले, भुजबळ आणि वडेट्टीवार यांना ‘हेराफेरी’ चित्रपटातून राजू, श्याम आणि बाबूभाई संबोधित केले. तसेच या तिन्ही नेत्यांच्या भाषण आणि कृतीत फरक असल्याचा टोला त्यांनी लगावला.

यावेळी शेलार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्गीय आयोग स्थापण्यासाठी दीड वर्ष चालढकल केली. त्यानंतर न्यायालयात सरकारने वेळकाढूपणा केला. या प्रकरणातील याचिकाकर्ते विकास गवळी आणि रमेश डोंगरे यांच्या काँग्रेस नेत्यांशी वारंवार बैठकी झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गुजरात आणि कर्नाटक राज्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत जे जमले ते राज्य सरकार का करू शकले नाही..? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. तसेच ओबीसीचा इम्पेरिअल डेटा हा केंद्र सरकारचा विषय नसून राज्यांनीच तो डेटा जमा करायचा असतो. यासंदर्भात विजय वडेट्टीवार अफवा पसरवत असल्याचा आरोप शेलार यांनी केला

Exit mobile version