| पनवेल | प्रतिनिधी |
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रभागनिहाय प्रारंभिक मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीबद्दलच्या हरकती व दुरुस्तीसाठी सुधारणा कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. प्रारुप मतदार याद्यांवर कोणाच्या हरकती अगर सूचना असल्यास त्या प्राधिकृत अधिकारी यांचे नावे सर्व संबंधित प्रभाग कार्यालय, पनवेल पालिका मुख्यालय येथे 20 ते 27 नोव्हेंबर अखेर कार्यालयीन वेळेत दाखल करता येणार होत्या.
त्यानुसार पनवेल महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. 27 नोव्हेंबरपर्यंत मतदार याद्यांवर हरकती घेण्यात येणार असून, मंगळवारपर्यंत 336 हरकती दाखल झाल्या आहेत. अनेक प्रभागातील नावे विविध प्रभागात अदलाबदल झाल्याने इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये इतर प्रभागातील तब्बल 8,500 नावे समाविष्ट झाल्याने शेकापचे चिटणीस प्रकाश म्हात्रे यांनी हरकत नोंदवली. प्रभाग क्रमांक 6 मध्ये मृत मतदारांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप मनसेचे खारघरचे पदाधिकारी गणेश बनकर यांनी केला आहे. प्रभाग 2 मतदारसंघातून पनवेल महापालिका 10, 8 या ठिकाणी देखील गंभीर चुका नोंदवल्या आहेत. प्रभाग क्रमांक 10 च्या मतदार यादीत कळंबोलीमध्ये तर खारघर, कोपरा, रोडपाली परिसरातील काही नागरिकांची नावे चुकीची आहेत.
आस्थापनांच्या पत्त्यावर मतदारांची नोंद
लिटल वर्ल्ड मॉल्स, ग्लोमेक्स मॉल आणि संजीवनी स्कूल, येरळा मेडिकल सारख्या आस्थापनांच्या पत्त्यावर देखील मतदार नोंदणी झाल्याचा आरोप मनसेचे गणेश बनकर यांनी केला आहे.
गोंधळ कायम
पनवेल पालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत. असे प्रकार सर्वच ठिकाणी नोंदवण्यात येत आहेत. विरोधकांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. यापूर्वी दुबार मतदारांचा मुद्दा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली होती. तरीही मतदार याद्यांमध्ये अद्याप दुबार नावे आहेत.
66 प्राप्त तक्रारींची छाननी करून हरकतीमधील त्रुटी दूर केल्या जातील. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यावर सर्व त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
नानासाहेब कामठे,
उपायुक्त, पनवेल महापालिका







