पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील एका महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला ओळखीतल्या एका व्यक्तीकडून सतत त्रास देत अश्लील संदेश पाठवले जात होते. या प्रकरणी त्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला या कर्जत येथे वास्तव्यास असताना दि.20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर पर्यंत संबंधित व्यक्ती ओळखीचा असल्याचा गैरफायदा घेत होता. त्याने वाईट हेतू मनात धरून पीडित महिलेला वारंवार घराबाहेर एकटी भेटण्यासाठी बोलावणे सुरू केले. तसेच, पीडितेची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून देखील त्याने तिला व्हॉट्सअपवरून अश्लील मागण्या करणारे संदेश पाठवले. याबाबत पीडित तरूणीने कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रसन्न बनसोडे आणि भारती कांबळे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी, कोणतीही दिरंगाई न करता या विकृत नराधमाविरुद्ध पोस्कोसह इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करण्यासाठी अथक प्रयत्न केले. पीडित मायलेकींना मानसिक आधार देत त्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्यही त्यांनी यावेळी केले.
