| पनवेल | प्रतिनिधी |
सीवुडस् येथील नामांकित महाविद्यालयातील 22 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करुन तिचे नग्नावस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ॲनेक्स जोशी (22) असे या तरुणाचे नाव असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित तरुणी भायखळा येथे राहण्यास आहे, तर आरोपी ॲनेक्स जोशी सीवुडस् येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून, त्याच महाविद्यालयाच्या वसतिगृहात तो राहात आहे. दोन वर्षांपूर्वी पीडित तरुणीची ओळख तिची मैत्रीण आणि तिच्या प्रियकराच्या माध्यमातून ॲनेक्स जोशी याच्यासोबत झाली होती. सदर ओळख हळूहळू मैत्रीतून प्रेमात परिवर्तीत झाली. जानेवारी 2024 मध्ये ॲनेक्स जोशीने पीडित तरुणीला पनवेलमधील फॉरेस्ट कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिच्या नकळत नग्नावस्थेतील तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले, असे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणाची माहिती पीडितेच्या मैत्रिणीच्या प्रियकराच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्याबाबत पीडित तरुणीला माहिती दिली. त्यानंतर पीडितेने ॲनेक्स जोशी याला जाब विचारला असता, त्याने उलट तिला धमकी दिली. यानंतर पीडित तरुणीने भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी ॲनेक्स जोशी याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी देणे आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याची सुरुवात पनवेलमधील हॉटेलमध्ये झाल्याने सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पनवेल शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्रेयसीवर अत्याचार करुन अश्लील फोटो व्हायरल
