रस्त्याच्या रुंदीकरणात वनविभागाची आडकाठी

कर्जत-नेरळ-शेलू राज्यमार्गावरील जमिनीचा प्रश्न कायम

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत-नेरळ-शेलू या कर्जत तालुका हद्दीमधील रस्त्याचे काँक्रिटकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे. मागील दहा वर्षांपूर्वी रस्ता दुपदरी करण्याचे काम सुरु आहे. त्या रस्त्यावर चार ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये वन विभागाची जमीन आहे. त्या जमिनीचा प्रश्न आजही निकाली निघाला नसल्याने पुन्हा एकदा वाहनचालक यांना दुपदरी रस्त्यात मध्येच एकपदरी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

खोपोली-कर्जत-कल्याण-शहापूर या राज्यमार्ग रस्त्यातील कर्जत तालुका हद्दीमधील 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या हायब्रीड तत्त्वावर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून, सध्या कर्जतपासून वडवलीपर्यंत या रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. आता त्या रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरु केले आहे. मात्र, कर्जत तालुका हद्दीत तब्बल पाच ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणात वन विभागाची जमीन आडकाठी ठरत आहे. कर्जतपासून पुढे शेलूकडे रायगड जिल्हा हद्दीकडे येताना किरवली, वांजळे-सावरगाव, नेरळ हुतात्मा चौक आणि शेलू या ठिकाणी वन जमीन असल्याने तेथे रस्ता हा वन विभागाच्या जागेत करता येत नाही. वन विभागाने शेलू येथे रस्त्याचे खोदकाम केले जात असताना ते काम बंद पडले होते. त्या गोष्टीला दहा वर्षे पूर्ण होऊनदेखील वन विभागाच्या जागेच्या अडचणी त्या रस्त्यांच्या कामांचे ठेके घेणारे मोठे ठेकेदार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावे करुन घेतली नाही. त्यामुळे आजही त्या ठिकाणी रस्ता निमूळताच राहिला असून, 20 वर्षांपूर्वी असलेला रस्त्याचा भाग तेथे असल्याने वाहनचालक यांना त्या भागातून वाहने पुढे नेताना धोकादायक स्थितीतून पुढे जावे लागते.

दरम्यान, कर्जत कल्याण रस्त्यावरील वन विभागाने अडवलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करून अखंड रस्ता तयार करून देण्यात यावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हण यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version