मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |

मुरुड पोलीस ठाण्यातच गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.1) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरुड पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याविषयी फिर्यादी यांना तपासासाठी बोलावण्यात आले होते. दप्तरी कक्षात पोलीस अधिकारी त्यांची चौकशी करीत असताना या गुन्ह्यातील आरोपी संतोष जनार्दन हिरवे यांची दोन मुले आणि एक विधी संघर्षित बालक अचानक पोलीस ठाण्यात दाखल झाले. चौकशी सुरू असतानाच पोलीस कर्मचारी हरी मेंगाळ यांनी सिद्धेश याच्याकडे नाव व पत्ता विचारला. या साध्या प्रश्नावरूनच वादाची ठिणगी पडली. दोन्ही आरोपींनी संतापून मोठ्याने आरडाओरडा करत पोलीस ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण केले. त्यांनी ठाणे अंमलदारांशी हुज्जत घालत थेट अंगावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‌‘तुम्हाला बघून घेतो’, अशी उघड धमकी देत त्यांनी सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांच्या आक्रमक वर्तनामुळे पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि सार्वजनिक शांततेलाही धक्का बसला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गदमले हे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Exit mobile version