विरोधी दिशेने वाहन काढण्याची वेळ; अडचणींचा गैरफायदा घेऊन लूट
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
अटल सेतूवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या 22 फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या ओव्हर डायमेन्शनल कार्गो (ओडीसी) वाहन चालकांसमोर टोल नाक्यावरील अपुऱ्या मार्गिकेमुळे मोठा पेच निर्माण होत आहे. याठिकाणी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने अनेक तास, तर काही वेळा दोन ते तीन दिवस खोळंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांच्या मदतीने विरोधी दिशेने वाहन काढण्याची वेळ येते. याच अडचणीचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांकडून ओडीसी वाहनचालकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप पुढे आला आहे.
अटल सेतूवरून ओव्हर डायमेन्शनल कार्गो (ओडीसी) वाहनांच्या वाहतुकीवर बंदी नसली, तरी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टोल नाक्यावरील अपुऱ्या मार्गिकेमुळे मोठ्या आकाराच्या वाहनचालकांसमोर मोठा पेच निर्माण होत आहे. विशेषतः 22 फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या वाहनांना टोल नाक्यावरून पुढे जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने अनेक तास, तर काही वेळा दोन ते तीन दिवस खोळंबून राहावे लागत असल्याची माहिती आहे. मात्र, मुंबईकडून जेएनपीटीच्या दिशेने येणाऱ्या ओडीसी वाहनांसाठी मार्ग उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जेएनपीटीहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांच्या मदतीने विरोधी दिशेने वाहन काढण्याची वेळ येते. त्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही प्रक्रिया धोकादायक ठरू शकते. याच अडचणीचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांकडून ओडीसी वाहनचालकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोप पुढे आला आहे.
कळंबोली परिसरात एका अवजड वाहनचालकाला ‘राँग साईडने गाडी काढून देतो’ असे सांगून अज्ञात व्यक्तीने जवळच्या एटीएममध्ये नेले. त्यानंतर चालकाकडून 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ओडीसी चालकांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन लूट केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, ओडीसी वाहनांना टोल नाक्यावरच अडवून ठेवावे लागत असल्याने वाहनचालकांचे वेळेबरोबरच इंधन, चालकांचे मानधन आणि इतर खर्च वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित मार्गिका उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
‘राँग साईड’मुळे अपघाताचा धोका
मोठ्या आकाराचे वाहन विरोधी दिशेने सोडताना समोरून येणाऱ्या वाहतुकीचा अंदाज घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेता संबंधित यंत्रणेने तातडीने मार्गिका उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या समस्येबाबत एमएसआरडीसी सोबत पत्र व्यवहार केला असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक विभागाकडून देण्यात आली.
मार्गिकेच्या तांत्रिक अडचणीपेक्षा त्यातून निर्माण होणारी असुरक्षितता आणि चालकांची संभाव्य लूट याकडे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
प्रशांत रणवरे,
सामाजिक कार्यकर्ता
