सर्व ग्रामपंचायती हागणदारी मुक्त, डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते सन्मान
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या स्वच्छ भारत मिशनमधील ओडिफ दर्जा मिळविण्याचा मान मिळविणार्या ग्रामपंचायती ठरल्या आहेत. हागणदारी मुक्त दर्जा सर्व ग्रामपंचायतींनी मिळविल्याने कर्जत पंचायत समिती ओडीफ प्लस नामावलीमध्ये पोहचली आहे. रायगड जिल्हा परिषदमध्ये ओडिफ प्लस दर्जा मिलाविल्याबद्दल कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
स्वच्छ गाव, स्वच्छ पर्यावरण आणि स्वच्छ भारत ही स्वच्छ भारत मिशनची व्याख्या असल्याने हागणदारी मुक्तीमध्ये तीन टप्पे ग्रामपंचायती यांना निश्चित करून देण्यात आले होते. त्यात हागणदारी मुक्त उद्दिमन, उज्ज्वल आणि यशस्वी असे तीन टप्पे ठेवण्यात आले होते. या तिन्ही टप्प्यांमध्ये प्रामुख्याने प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय असले पाहिजे,प्रत्येक शाळा, अंगणवाडी केंद्रावर शौचालय असले पाहिजे आणि गावात सांडपाणी व्यवस्थापन किंवा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया सुविधा असली पाहिजे अशा अटी होत्या. त्याशिवाय ओडिफ मधील पुढील दर्जा मिळविण्यासाठी इतर अटी प्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यांची स्वतंत्र प्रक्रिया व्यवस्थापन बंधनकारक करण्यात आली आहे. तर ओडीरफ प्लस दर्जा मिळविण्यासाठी या सर्व अटी शिवाय शौचालय असलेल्या ठिकाणी असलेल्या भिंतींवर स्वच्छतेचे संदेश, परिसर स्वच्छतेचे राखण्याचे आवाहन करणारे संदेश पेंटिंग करून घेण्याची महत्वाची अट होती.
हागणदारी मुक्त तालुका बनण्यासाठी ओडीएफ प्लससाठी उद्दमन, उज्वल आणि उत्कृष्ठ दर्जा मिळविणार्या ग्रामपंचायती यांचे सर्व निकष यांचे गुणांकन लक्षात घेवून रायगड जिल्ह्यात कर्जत पंचायत समितीने जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. ओडिएफ प्लस नामांकन मिळाल्याबद्दल स्वच्छ भारत मिशनचे आढावा बैठकीत जिल्हा परिषदमध्ये सन्मानित करण्यात आले. तालुक्यात 55 ग्रामपंचायती असून प्रत्येक ग्रामपंचायत हागणदारी मुक्त होण्यासाठी ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्या सहकार्याने तालुका हागणदारी मुक्तीमध्ये ओडीएफ प्लस दर्जा मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. स्वच्छ भारत मिशनचे आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी कर्जत तालुका ओडीएफ प्लस चे प्रमाणपत्र स्विकारले. कर्जत पंचायत समिती आणि सर्व ग्रामपंचायत यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान झाला असल्याचे साबळे यांनी जाहीरपणे मान्य केले आहे.