मुस्लिम कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधान; नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन नवा वाद

। मुंबई । प्रतिनिधी ।

भाजप नेते नितेश राणे यांच्या एका वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापू लागलं आहे. मुस्लिमांना मोदी पसंत नाहीत, असं विधान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलं आहे. ज्या मुस्लिम कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त मुले असतील त्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे ही योजना एक महत्त्वाचे कारण मानले जात असतानाच, नितेश राणेंचे हे विधान राजकारण तापवणारं ठरु शकतं. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवलीतून नितेश राणे विजयी झाले आहेत. मात्र त्यानंतर त्यांना कुठलंच भान नसल्याचं त्यांच्या वक्तव्यावरुन दिसत असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ आयोजित एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी, दोनपेक्षा अधिक अपत्य असणार्‍या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळू नये, अशी भूमिका मांडली. मुस्लिम समाजातील लोक निवडणुकीत ना मोदीजींच्या, ना महायुतीच्या पाठीशी होते. पण सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी मुस्लिम समाजातील लोक पुढे असतात. राणे यांनी लाडकी बहिण योजनेत बदल करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे.

नितेश राणे म्हणाले की, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक आसून त्यांना मारहाण केली जात आहे. पाकिस्तानमध्येही हिंदू अल्पसंख्याक आहेत, त्यांना एकतर इस्लाम स्वीकारण्याचा पर्याय देण्यात येतो किंवा ठार मारण्यात येते. याउलट आपल्या देशात त्यांच्यावर किती प्रेम केले जाते. त्यांच्यासाठी विविध योजना आखल्या जातात. हे लोक सर्व सरकारी योजनांचे लाभ घेतात. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत बदल करण्याची विनंती मी लवकरच मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.

आदिवासी समाजाला सवलत
राणे म्हणाले की, आदिवासी समाज वगळता ज्यांना 2 पेक्षा जास्त मुले आहेत अशांना शासकीय योजनेतून बाहेर काढावे. ज्यांना दोन मुले आहेत त्यांनाच हा लाभ मिळावा, असा नियम केला पाहिजे. अन्यथा ते लोक आमच्या योजनेचा फायदा घेतील. सर्व सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि मतदानाच्या दिवशी आम्हाला इस्लाम हवा आहे असं बोलतात. इतर वेळी तुमचा इस्लाम कुठे असतो? असं विधान नितेश राणेंनी केलं.
Exit mobile version