स्नेहल जगताप यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान
| रायगड | खास प्रतिनिधी |
शिवसेना शिंदे गटाते पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी शिवसेना (उबाठा) नेत्या स्नेहल जगताप यांना उद्देशून बोलताना अपमानजनक शब्द उच्चारल्याने जिल्ह्यात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा बेताल वक्तव्य करणार्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्नेहल जगताप यांनी केली आहे.
एकीकडे लाडकी बहिण योजना राबवायची आणि दुसरीकडे त्याच बहिणींनी विरोधात बेताल आणि असभ्य भाषेत बोलायचे, असा सरार्स प्रकार महायुती सरकारमध्ये सुरु आहे. हि घटना अतिशय निंदनीय असल्याचेही जगताप यांनी सांगितले आहे.
स्नेहल या काँग्रसेचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या सुकन्या आहेत. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्नेहल यांना शिवसेना (उबाठा) पक्षात घेतले. स्थानिक आमदार गोगावले यांना स्नेहल यांच्या रुपाने महाड विधानसभा मतदार संघात आव्हान उभे राहीले. त्यामुळे आमदार गोगावले यांना विधानसभेची निवडणूक अजिबात सोपी नाही. तुम्हाला काम करणारा भाऊ पाहीजे की, ** बनवणारी बहिण पाहीजे, असे एका कार्यक्रमात बोलताना त्यांची जीभ घसरली. आमदार गोगावले यांच्या या वक्तव्याने महायुती सरकार महिलांचा अपमान करत असल्याची धारणा महिलांची झाली आहे.
दरम्यान, आमदार गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागीतलेली नाही. त्यामुळे आगामी कालावधी याच मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येते.