| पनेवल | प्रतिनिधी |
निवडणुकीच्या काळात सरकारी तिजोरीतून लाडक्या बहिणींना पैसे वाटप करुन त्यांना आमिष दाखविण्यात येत आहे. हा आदर्श आचार संहितेचा भंग आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केला. निवडणुकीनंतर ही योजना बंद करण्याचा सरकारचा डाव आहे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला. निवडणूक काळात आम्हाला बँकेतून कर्ज वाटप करुन देत नाहीत, परंतु दुसरीकडे मतांसाठी सरकारी तिजोरीवर डल्ला मारतात त्याला आमचा आक्षेप आहे, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे आदर्श आचरसंहितेचा यांनी अभ्यास केला आहे की नाही, असा सवालही पाटील यांनी उपस्थित करत सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली.
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रविवारी (दि. 11) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. बाळाराम पाटील, आर.सी. घरत, काशिनाथ पाटील, नारायण घरत, शिरीष घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, “निवडणुकीनंतर आमचे उमेदवार कुठेही जाणार नाहीत; जे तिकडे गेले आहेत, ते पूर्वी आमचेच होते. शेतकरी कामगार पक्ष ही कार्यकर्ता घडविणारे विद्यापीठ असून, अनेक कार्यकर्ते आम्ही घडविल्याचा अभिमान आहे. तरुण कार्यकर्ता हीच आमची ताकद आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते एकीचे बळ दाखवून चांगले काम करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवरही भाष्य करत सांगितले की, शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजप मोठा झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन करत पनवेलकरांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर
निवडणुकीच्या आधी विरोधकांचा प्रचार थांबवण्यासाठी आणि मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वारेमाप केला गेला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर केला. सपकाळ म्हणाले की, मतदान यादीत दुबार मतदार असलेल्या नावासमोर स्टार लावण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने ठरवले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. नगरपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसे वाटप आणि बोगस मतदान घडल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचेही साथ आहे. सपकाळ म्हणाले, जर ही परिस्थिती अशीच राहिली, तर भारतात बांगलादेश आणि श्रीलंकेसारखी राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते.







