लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिडको कार्यालयात एक मोठी कारवाई केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास हरिभाऊ जगताप (57) आणि शिपाई हरेश सोनवणे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली. सिडकोच्या 22.5 टक्के विस्तारित योजने अंतर्गत एका रजिस्ट्रेशनचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी 22 हजरी 500 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. मूळपद अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या रामदास जगताप यांनी ही लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने सिडको कार्यालयात सापळा रचला. मुख्य भूमी अधिकारी जगताप यांच्या सूचनेनुसार शिपाई हरेश सोनवणे (वर्ग-4) याने लाचेची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण झाली. सिडको सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणात थेट अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version