शेतकरी मेटाकुटीला, अधिकारी-कर्मचारी रजेवर
| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
ऐन गरजेच्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा फटका सुधागडमधील शेतकऱ्याला बसला आहे. दिवाळीची सुट्टी संपून कामाचा दिवस सुरु होऊनही सुधागड येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच नुकसानग्रस्त झालेला शेतकरी मदतीच्या आणि शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयाच्या दारात येत आहे. अनेक शेतकरी नुकसान होऊन मेटाकुटीला आले असताना, दुसरीकडे जनतेचे सेवक म्हणवणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी मात्र बिनधास्तपणे सुट्ट्या उपभोगताना दिसत आहेत. दिवाळीची सुट्टी संपल्यावरही कार्यालयात शुकशुकाट असल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून, त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या या असंवेदनशील कारभारावर सामाजिक कार्यकर्ते केतन म्हस्के यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “शेतकरी मदतीसाठी कार्यालयात हेलपाटे मारत असताना, अधिकारी व कर्मचारी रजेवर असणे हे अत्यंत गंभीर आहे. जनतेच्या कामांपेक्षा कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी महत्त्वाची आहे का? प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन गैरहजर कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या सामूहिक सुट्टीमुळे तहसील कार्यालयातील कामाचा बोजा वाढला असून, याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आणि विशेषतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कामांवर होत आहे. तातडीची कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी वाढत आहे. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांची कामे आणि शासकीय कामकाज सुरळीत चालण्यासाठी, तहसील कार्यालयातील रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे आणि वरिष्ठांनी या गैरहजेरीची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सुधागडमधून जोर धरू लागली आहे.
