| आगरदांडा | प्रतिनिधी |
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रकिनारी अंमली पदार्थाचा साठा आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्लास्टिक गोणीमध्ये चरस सदृश पदार्थ सापडल्याने किनाऱ्यावरील सुरक्षा अधिक करण्यात आली आहे. या बाबत ची गुप्त माहिती मिळाल्यावर तात्काळ मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. समुद्रकिनारी पडून असलेल्या संशयास्पद प्लास्टिक गोणीची तपासणी करण्यात आली. त्या गोणीमध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ दिसुन आले. हा चरसचा साठा कुठून आला असा प्रश्न उपस्थित झाला.
अखेर पोलिसांनी समुद्रकिनाऱ्या बरोबरच शोध मोहीम सुरु केली. पोलिसांचा फौज फाटा किनारी दाखल झाला. त्यामुळे काही वेळ परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या गोणी मध्ये 11 किलो 148 ग्रॅम वजनाच्या 55 लाख 74 हजार रुपयांच्या किंमतीचा साठा आढळून आला. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबागच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रतीक्षा खेतमाळीस यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चर्चा करून माहिती दिली.







