। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रशियन तेल आयातीवर बंदी घातल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशा इशारा रशियन उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी सोमवारी दिला आहे. कारण पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी युक्रेनसंदर्भात मॉस्कोवर आणखी निर्बंध घालण्याचा विचार केला आहे. त्यावरून रशियाने तेलाचे भाव वाढवण्याची धमकी दिली आहे.
रशियन तेलावरील बंदीमुळे जागतिक बाजारपेठेवर गंभीर परिणाम होतील. किंमतीतील वाढ ही प्रचंड जास्त असेल. तेलाची किंमत प्रति बॅरल 300 च्या पार जाऊ शकते, असा इशारा नोव्हाक यांनी रशियन वृत्तसंस्थांशी बोलताना दिला. तसेच या किमती वाढल्यास त्या कमी होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागेल आणि युरोपियन ग्राहकांना ते महागात पडेल. त्यामुळे युरोपियन राजकारण्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कारण गॅस स्टेशन, विजेच्या आणि हीटिंगच्या किमती गगनाला भिडतील, असे ते म्हणाले.
भारतावर काय परिणाम होणार?
भारताची तेलाची गरज भागवण्यासाठी जवळपास 84 टक्के खनिज तेल आपण आयात करतो. देशांतर्गत पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या भावाशी निगडित असतात. यंदा जुलै 2008 नंतर प्रथमच ब्रेंट क्रूड आणि वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 139 डॉलर प्रतिबॅरल आणि 130 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले होते. तेलाचे भाव डिसेंबरपासून वाढत आहेत. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीत या इंधनांवर विविध कर वा शुल्क कमी करण्याची शक्यता नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंगत अशी जवळपास 15 ते 16 रुपये प्रतिलिटर दरवाढ होईल, असा अंदाज आहे.