पालीवाला महाविद्यालयात जुने कपडे संकलन शिबीर
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी आणि आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी समाजबंध संस्था व शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालय (पाली-सुधागड) यांच्या संयुक्त विद्यमाने एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे सोमवार दि.16 ते शनिवार दि.21 या कालावधीत जुने कपडे संकलन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराद्वारे गोळा करण्यात आलेल्या कपड्यांचा वापर समाजबंध संस्थेच्या कापडी सॅनिटरी पॅड निर्मिती प्रकल्पासाठी केला जाणार आहे. सुती कपडे, होजिअरी आणि जीन्सपासून हे सॅनिटरी पॅड्स तयार केले जातात. तयार केलेले हे पॅड्स आदिवासी महिलांमध्ये मासिक पाळीबाबत जनजागृती करून त्यांना विनामूल्य वाटले जातात. तसेच, जे कपडे वापरण्यायोग्य असतील, ते थेट गरजूंपर्यंत पोहोचवले जाणार आहेत.
आयोजकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्याकडील जुने परंतु स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे, साड्या, तसेच जीन्स शेठ जे. एन. पालीवाला महाविद्यालय येथील संकलन केंद्रावर आणून द्यावेत. कपड्यांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक साहित्याचीही गरज असून नागरिक खालील वस्तूही दान करू शकतात. ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य (वह्या, पेन इ.), पेपर रद्दी यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सर्जेराव पाटील, डॉ. अनिल झेंडे आणि लिंताज ऊके राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
आपल्या घरातील अडगळीत पडलेल्या वस्तू एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, अशी विनंती महाविद्यालयातर्फे करण्यात आली आहे.







