। मुंबई । प्रतिनिधी ।
जुहू येथे मुलाने आईकडून बळजबरीने कागदपत्रे हिस्कावात संपत्तीसाठी वृद्ध आईला मारहाण केली. याबाबत जुहू परिसरात राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध आईने खार पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार मुलावर ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
गुन्हेगाराच्या वडिलांचा फर्निचर, कार्पेट, पुस्तक आणि पितळीच्या स्टॅच्यूचा व्यवसाय होता व हे सामान ठेवण्यासाठीच गोडाऊन जोगेश्वरी पश्चिमच्या सिद्दीकी इस्टेटमध्ये आहे. तक्रारीनुसार पीडितेचा मुलगा हा रागीट स्वभावाचा असून व्यसनी आहे. यामुळे बऱ्याचदा तो त्याच्या पत्नीला शिवीगाळ करायचा तसेच आई-वडिलांनाही मानसिक त्रास द्यायचा. अशात ९ सप्टेंबर, २०२१ मध्ये अटॅक येऊन वडिलांचा मृत्यू झाल्याचा एफआयआरमध्ये दावा करण्यात आला आहे .मुलाने पत्नी आणि दोन लहान मुलांना सोडून अन्य महिलेसोबत राहायला सुरुवात केली. या दरम्यान त्याने आईला धमकावून करोडो रुपयांचे दोन फ्लॅट तसेच गोडाऊनमधील बऱ्याच वस्तू विकल्या. हा सगळा प्रकार त्याने तिला धमकावत आणि मारहाण करून केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.







