ऑलिम्पिक क्लोजिंग सेरेमनी कधी, कुठे

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. क्लोजिंग सेरेमनी 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. उद्घाटन समारंभाच्या वेळी, सीन नदीवर ऍथलीट्सची परेड आयोजित करण्यात आली होती. आता क्लोजिंग सेरेमनीही त्याच पद्धतीने होणार का, असा प्रश्‍न लोकांच्या मनात निर्माण होत आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची क्लोजिंग सेरेमनी फ्रान्समधील सर्वात मोठ्या स्टेडियम स्टेड डी फ्रान्समध्ये होणार आहे. या स्टेडियममध्ये एकाच वेळी 80 हजार प्रेक्षक बसू शकतात. हा सोहळा भारतात 12 ऑगस्ट रोजी सकाळी साडेबारा वाजता सुरू होईल. किमान दोन तास हा सोहळा रंगणार आहे. क्लोजिंग सेरेमनीच्या आयोजकांनी जारी केलेल्या निवेदनानुसार पॅरिस ऑलिम्पिकच्या क्लोजिंग सेरेमनीत 100 हून अधिक कलाकार परफॉर्म करणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या क्लोजिंग सेरेमनीत अ‍ॅक्रोबॅट्स, नर्तक आणि सर्कस कलाकारांचाही समावेश असेल. एक कॉन्सर्ट होईल ज्यामध्ये स्नूप डॉग, सेलीन डायन, बिली आयलीश आणि रेड चिली पेपर्स नावाचा रॉक बँड देखील परफॉर्म करेल. जुन्या परंपरेनुसार 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या आयोजकांना क्लोजिंग सेरेमनीत ऑलिम्पिक ध्वज दिला जाईल. याशिवाय अमेरिकन संगीतकार ‘हेर’ अमेरिकेचे राष्ट्रगीत गाताना दिसणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच एक माहितीपटही दाखवण्यात येणार असून, त्यात भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाची झलक दाखवण्यात येणार आहे. परफॉर्मन्स आकाशातही पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन समारंभात पी.व्ही. सिंधू आणि शरत कमल यांना भारतीय संघाचे ध्वजवाहक बनवण्यात आले होते. आता क्लोजिंग सेरेमनी भारतीय संघाचे ध्वजवाहक मनू भाकर आणि पीआर श्रीजेश असतील. भाकेरने 2024 ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली आहेत, तर पीआर श्रीजेश कांस्यपदक जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. भारतीय हॉकी संघाने सलग दुसर्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा मान आधी निरज चोप्राला दिला होता, मात्र श्रीजेश हॉकीतून निवृत्त होत असल्याने पी.टी. उषा यांनी निरजाला विनंती केली होती की, ही संधी श्रीजेशला द्यावी, त्यावर निरजने तातडीने होकार देत सर्व भारतीयांची मने जिंकली.

Exit mobile version