ऑलिंपिक पात्रता आव्हानात्मक; एवढ्यात निवृत्तीचा विचार नाहीच!

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गेल्या काही वर्षांमध्ये दुखापत व सुमार फॉर्म यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पीछेहाट झालेल्या साईना नेहवाल हिने मात्र बॅडमिंटन या खेळाला अलविदा करण्याचा निर्णय घेतलेला नाही. 2024 मधील पॅरिस ऑलिंपिकच्या पात्रता फेरीमध्ये यश मिळवणे आव्हानात्मक असले, तरी प्रयत्न करणार आहे. तसेच निवृत्तीचा विचार सध्या तरी मनामध्ये सुरू नाही, असे तिने याप्रसंगी स्पष्ट केले. गुरुग्राम येथे 24 सप्टेंबर रोजी हार्वेस्ट गोल्ड ग्लोबल शर्यत होणार आहे. या शर्यतीची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साईना नेहवालची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी साईना पुढे म्हणाली, एक ते दीड तास सराव केल्यानंतर गुडघा दुखायला लागतो. त्यानंतर गुडघा वाकतही नाही. यामुळे दुसऱ्या सराव सत्रामध्ये सहभागी होता येत नाही.

डॉक्टरकडून इंजेक्शन देण्यात येत आहेत. फिजियोकडूनही मदत होत आहे; पण दुखणे व सूज जास्त प्रमाणात कमी झालेली नाही. यामधून पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी अवधी जाणार आहे. मला माहीत आहे की, ऑलिंपिक जवळ आले आहे; पण तोपर्यंत तंदुरुस्त होणे आव्हानात्मक असणार आहे. तंदुरुस्त नसतानाही स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास मनाजोगता निकाल मिळत नाही, असे साईनाने स्पष्ट केले.

अव्वल दर्जाच्या खेळाडूंना सामोरे जाण्याआधी फक्त एका तासाचा सराव करून चालणार नाही. ॲन सीयंग, ताई यिंग व अकाने यामागुची यांसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना हरवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून खेळ करावा लागतो, असे साईना आवर्जून सांगते.

सिंधूचे मनोधैर्य वाढवले
साईना नेहवालप्रणाणे भारताची दिग्गज खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला दुखापतीमधून बाहेर येत प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यावर साईना म्हणाली, सिंधू हिने गेल्या आठवड्यात प्रकाश पडुकोन बॅडमिंटन अकादमीत सराव केला. विविध प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळल्यास खेळामध्ये सुधारणा होऊ शकते.
एकाच प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळताना आमूलाग्र बदल होत नाही. मी प्रशिक्षक बदलला आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. त्यामुळे सिंधूचा निर्णय योग्य आहे, असा विश्वास साईनाकडून व्यक्त करण्यात आला.

प्रत्येक खेळाडूला निवृत्त व्हावे लागतेच. जेव्हा आपले शरीर साथ देत नाही, तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेतला जातो. यासाठी मर्यादा नसते. पुनरागमनासाठी प्रयत्न करीत आहे. देशासाठी प्रदीर्घ काळ खेळल्यानंतर अजूनही बॅडमिंटन खेळण्याची इच्छा आहे.ऑलिंपिक व आशियाई या दोन्ही स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी माझ्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धांमध्ये खेळण्याची तीव्र इच्छा नाही. पण संधी मिळाल्यास विक्रमांसह पदकांवर मोहोर उमटवण्यासाठी जीवाचे रान करीन.

साईना नेहवाल, बॅडमिंटनपटू, भारत
Exit mobile version