बहिणींची नावे वगळणे पडले महागात

भावांना उरण न्यायालयाचा दणका

| उरण | वार्ताहर |

भावांनी बहिणींची नावे वगळून वारस दाखला मिळविला होता. परंतु बहिणींनी उरण न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. वारसा दाखलामध्ये मुलींची नावे नसल्याचे वकील किशोर ठाकूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सदर वारस दाखला उरण येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर विकास बडे यांनी रद्द करून तो न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे फसवणूक करणे भावांना चांगलेच महागात पडले आहे.

उरण महालण विभागातील भेंडखळ गावातील गंगाबाई बळी घरत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात यशवंत व दामोदर अशी दोन मुले व विमल, मथुरा व प्रभावती अशा तीन मुली असे वारस होते. परंतु दोन भावांनी संगनमताने बहिणींना मालमत्तेतील हिस्सा देऊ नये या हेतूने त्या तीन सख्या बहिणींची नावे वारस म्हणून दिली नाहीत. दोन्ही भावांच्या नावाने उरण न्यायालयातून वारस दाखला मिळविला होता. याची माहिती तीन बहिणींना लागताच त्यांनी उरणमधील वकील किशोर ठाकूर यांच्यामार्फत सदरचे वारस प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. उरण येथील न्यायाधीश विकास बडे यांच्या समोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयात दस्तऐवज, साक्षी पुराव्यावरून भावांनी प्राप्त केलेले वारस प्रमाणपत्र रद्द करून सदरचे प्रमाणपत्र न्यायालयात दाखल करण्याचे आदेश संबंधित भावांना दिले आहेत.

दरम्यान, मालमत्ता बळकाविण्यासाठी नातेवाईक कोणत्याही थराला जात आहेत. कोणी वारसा दाखल्यातून नावे बेदखल करतात, तर कोणी बहिणींची अथवा भावांची नावे वारस म्हणून देत नाहीत अथवा मयत दाखविण्यास मागेपुढे पहात नाहीत. अशा घटना रायगड जिल्ह्यात सर्रासपणे घडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महालण विभागातील भावांची बनवेगिरी उघड होऊन सदर वारस दाखला रद्द झाल्याने इतरांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version