सवाई पाटील यांचे गौरवोद्गार, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन
| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ओमकार क्रीडा मंडळाने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. निटनेटके नियोजन आणि शिस्तबद्ध खेळ यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात येथील कबड्डी स्पर्धांची ओळख आहे, असे गौरवोद्गार शेकापचे युवा नेते सवाई पाटील यांनी काढले. वेश्वी येथे ओमकार क्रीडा मंडळाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे उद्घाटन शेकापचे युवा नेते सवाई पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. त्याप्रसंगी बोलत होते.

स्पर्धामुळे खेळाडुंसाठी नवनवीन संधी निर्माण होत असतानाच ते त्यांच्यातील क्षमता देखील जाणून घेत असतात. स्पर्धांमुळे सांघीक जबाबदारीची जाणीव वाढते, असेही ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या तसेच वेश्वीचे माजी सरपंच तथा ओमकार क्रीडा मंडळाचेसर्वेसर्वा प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या संघाचे विशेष कौतुक केले. कोरोना कालावधीतली अपवाद वगळता गेल्या 28 वर्षापासून विनाखंड या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. वेश्वीच्या कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू राज्यपातळीवर देखील गाजले आहेत. दरवर्षी चांगले खेळाडू घडावेत याचसाठी अशा स्पर्ध्ाांचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले.
माझ्या सोबत असणारे माझे सहकारी, ग्रामस्थ यांच्यामुळे हे जरी शक्य असले, तरी आमचे नेते आमदार जयंत पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, माजी आमदार पंडित पाटील, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, चित्रा पाटील यांची खंबीर साथ असल्यानेच हे सर्व शक्य होते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन तसेच बजरंगबली मारुतीला मान्यवरांसह खेळाडूंनी नमन केले. उद्घाटनाचा पहिला सामना जय हनुमान सहाणगोठी विरुद्ध जय गणेश धोकवडे यांच्यात झाला. सुरुवातीलाच धोकवडे संघाने सहाणगोठी संघावर दबाव टाकत सामन्यावर पकड घेतली होती. याप्रसंगी सदानंद शेळके, गजानन नाईक, विष्णू मगर, राघव गुरव, संदीप घरत, वेश्वीच्या माजी सरपंच तथा सदस्य आरती पाटील, जुई शेळके यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






