धारदार चाकूने हल्ला; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
| पेण | प्रतिनिधी |
ओमकार म्हात्रे या तरुणावर कल्पेश बोरेकर नामक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने चाकूहल्ला करून त्याला मृत्यूशयावर पाडले आहे. ओमकारचा अपराध हाच की, पेणमधील स्वयंघोषित पत्रकार रस्त्याच्या कडेला पडलेला पाहून त्याला दवाखान्यात पोहोच केले. त्याला दवाखान्यात पोहोच केले या रागातून कल्पेश याने ओमकारवर धारदार चाकूने पोटात व छातीवर वार केले. हे वार एवढे जोराचे होते की, ओमकार याच्या पोटातील आतडे बाहेर आले. ही सर्व घटना पेण जिल्हा उपरूग्णालय पेण येथे झाली. त्यावेळी उपरूग्णालयातील सीसीटीव्ही सुरू होते, तसेच ऑन ड्युटी पोलीसदेखील होते. परंतु, एवढा मोठा हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. याबाबत पूर्ण पेण शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
याविषयी ओमकारचा भाऊ संकेत याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ओमकार हा वाघ नामक व्यक्तीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेला होता. पार्टीवरून येत असताना रस्त्याच्या कडेला स्वयंघोषित पत्रकार सुभाष टेंबे हा पडलेल्या अवस्थेत त्याला दिसला. म्हणून त्याने त्याला पेण जिल्हा उपरुग्णालयात दाखल केले. तेथे दारूच्या नशेत कल्पेश आला आणि त्याने ओमकारला विचारणा केली, सुभाष टेंबेला दवाखान्यात का आणलास? यावरून ओमकार आणि कल्पेश यांच्यात बाचाबाची झाली आणि कल्पेश याने धारदार चाकूने ओमकारवर वार केले. त्याच्याबरोबर आणखी त्याचे साथीदार होते. जर घटना पहाटे तीन वाजता होते, तर त्याचा गुन्हा रात्री 10.30 वाजता नोंद होतोय, हे योग्य आहे का? ज्याच्यावर हल्ला झालाय तो धोक्याची पातळी पार करून मृत्यूशी झुंज देतोय. असे असताना नातेवाईक गुन्हा नोंदवायला आले नाही म्हणून गुन्हा नोंदविण्यास दिरंगाई करणे किती योग्य आहे. त्यातच घटनास्थळी असलेल्या पोलीस कर्मचार्याची जाबाबदारी नव्हती का? की स्वतःहून झालेल्या घटनेची खबर पोलीस ठाण्यात देऊन गुन्हा नोंद करणे व आरोपीला ताब्यात घेणे. मात्र, असे न होता खाकीकडून आरोपीला पळण्यास वाव दिल्यासारखे झाले, अशी चर्चा होत आहे. एवढे सर्व करूनसुद्धा आरोपी सरेआम सांगत होता मला राग आला म्हणून मी त्यावर चाकूचे वार केले. या वृत्तीला राक्षसी वृत्तीच म्हणावी लागेल. तरी उशिरा का होईना, पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत.
माझ्या मुलाचा दोष काय? माझ्या मुलाने रस्त्याच्याकडेला पडलेल्या माणसाला माणुसकी धर्म समजून दवाखान्याता नेले आणि अॅडमीट केले. हा गुन्हा केला का? त्याची त्याला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आहे. माझ्या मुलावर ही अवस्था आणणार्या नराधमाला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ओमकारच्या आईने केली आहे.
महिला पत्रकारांना पोलिसांकडून उर्मट उत्तरे गर्जा रायगड आणि दैनिक कृषीवलच्या महिला प्रतिनिधी जिल्हा उप रुग्णालयात झालेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी 5 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता पेण पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी पोलीस कर्मचारी डोकले यांनी झालेल्या घटनेची माहिती तर दिलीच नाही, उलट सांगितलं की गुन्हा नोंद झालेला नाही, तुम्ही खोटी माहिती छापू नका, आज कर्मचारी उपलब्ध नाहीत, त्यामुळे गुन्हा नोंद नाही. ओमकार दवाखान्यात व्यवस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका हे असे बोलणे पोलीस कर्मचार्याला किती योग्य आहे? ते ही महिला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी.