ओमसाई कबड्डी स्पर्धेत विजय बजरंग उपांत्यपूर्व फेरीत

| मुंबई | प्रतिनिधी |
विजय बजरंगने 5-5 चढायांच्या डावात वारसलेन संघावर 40-35 (9-4) अशी मात करीत ओम् श्री साईनाथ ट्रस्टने आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी (स्थानिक) पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. त्याच बरोबर पंचगंगा, श्री साई क्लब, अमर संदेश यांनी देखील विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रभादेवी समुद्र किनार्‍या जवळील मंडळाच्या पटांगणावर आजच्या चौथ्या दिवसाची सुरुवात विजय बजरंग विरुद्ध वारसलेन या अत्यंत रोमहर्षक सामन्याने झाली. मध्यांतराला वारसलेन संघाकडे 18-13 अशी महत्वपूर्ण आघाडी होती. सामना संपायला काही मिनिटे असेपर्यंत ती त्यांच्याकडे होती. पण शेवटी विजय बजरंगने 31-31 अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले आणि 5चढायांचा डावात विजयश्री 5 गुणांनी खेचून आणली. मकरंद भगत, सौरभ गुरव, शैलेश गुरव विजय बजरंग कडून, तर प्रथमेश आंग्रे, आर्यन कुरसरी, सोहम नार्वेकर वारसलेन कडून उत्कृष्ट खेळले.

दुसर्‍या सामन्यात पंचगंगा मंडळाने जागृती मंडळावर 30-20 अशी मात करीत आपली धोडदौड सुरूच ठेवली. विश्रांतीला 17-07अशी आघाडी घेणार्‍या पंचगंगाला विश्रांतीनंतर मात्र जागृतीने कडवी लढत दिली. पण विज्यापाऊन विजयापासून मात्र ते दूरच राहिले. या विजयाचे श्रेय रोहित देसाई, प्रणिल गीज या पंचगंगाच्या खेळाडूंना जाते.विशाल नमसले, मानस सावंत यांच्या उत्तरार्धातील खेळ जागृतीला विजयी करण्यास कमी पडला. वेदांत वारीशी, तेजस गायकवाड, प्रणित गावंड यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या बळावर श्री साई क्लबने आकांक्षा मंडळावर 32-24अशी मात केली. रोहित मोहिते, हृतिक कुंभार यांनी आकांक्षाकडून चुरशीची लढत दिली. शेवटच्या सामन्यात अमर संदेशने नव जवानला 31- 19 असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. अभिषेक पाल, कल्पेश ठाकूर, शुभम पाटील अमर संदेशकडून, तर साहिल दळवी, अमित वाडकर नव जवानकडून उत्कृष्ट खेळले.

Exit mobile version