ॲनिमलच्या निमित्तानं- सुनिल बोधनकर

ॲनिमलनं सध्या धुमाकूळ घातलाय, हा लेख सिनेमाची समीक्षा किंवा तत्सम काही नाही, ॲनिमल सिनेमामुळे बॉलिवुडमध्ये होऊ घातलेल्या उत्क्रांती (हा शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व, पण, दुसरा शब्दच फिट होत नाहीय) बद्दल आहे. त्यामुळे ज्यांनी सिनेमा अजून पाहिलेला नाही त्यांनी हा लेख खुशाल वाचावा. थोडक्यात सिनेमाबाबत कसलेही स्पॉयलर्स नाहीत!

रणबीरचा ॲनिमल सिनेमा सध्या दोन ठिकाणी प्रचंड धुमाकूळ घालतोय, एक म्हणजे थिएटर्स आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया! ॲनिमलबाबत दोन टोकांची मतं आहेत. इतकी हिंसा, क्रूरपणाच्या विरोधात मतं मांडणारेही आहेत तर त्याहून जास्त या सिनेमाचे चाहतेही आहेत. मात्र, सिनेमा चांगला की वाईट हा आपला विषय हा नाही. सिनेमा कुणाला आवडतोय कुणाला नाही यापेक्षा या सिनेमामुले जे बॉलिवुडमध्ये बदलतंय आणि बदललंय त्यावर आपला फोकस आहे, कारण सिनेमा धो-धो चालतोय आणि सिनेमानिर्मिती हा धंदा आहे, सृजनशीलता वगैरे हे फक्त बोलण्यापुरतं! त्यामुळे यापुढे मागणीनुसार पुरवठा या अर्थशास्त्रातल्या नियमानुसार पुढचे सिनेमे बनले तर आश्चर्य वाटायला नको.

हिंदी सिनेसृष्टीचं ज्यानं कुणी बॉलिवुड हे नामकरण केलं असेल त्याला आता बॉलिवुडसाठी नवीन नाव शोधावं लागणार हे नक्की, कारण आता बॉलिवुड हे ‘टॉलिवूड’मय झालंय. याला कारणीभूत फक्त प्रेक्षकांची बदललेली आवड नाही तर हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकांचा तोचतोचपणा कारणीभूत आहे. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे कोव्हिड 19! होय कोव्हिड, कारण कोव्हिडच्या काळात एकीकडे लोकांना भयंकर त्रास झाला तसंच दुसरीकडे लोकांनी आपली मनोरंजनाची भूक भागवून घेतली. लोकांनी घरबसल्या जेवढं मिळेल तेवढं किंवा सुट्टी नसल्याच्या कारणानं किंवा कामाच्या व्यापामुळे जे पाहता आलं नाही ते सगळं अधाशासारखं पाहून संपवलं. आणि ही भूक भागवायला ओटीटी प्लॅटफॉर्म्स सज्जच होते. हे तेच लोक आहेत जे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहतात, याच लोकांमुळे सिनेमे हिट होतात किंवा फ्लॉप! आता याच ‘डिसाईडिंग ऑडियन्स’नं सगळं काही पाहून संपवलं, तेव्हा त्यांची भूक काहीतरी नवीन, वेगळं पाहण्याची होती, नवीन म्हणजे फक्त लार्जर दॅन लाईफ नव्हे (तसं असतं तर रणवीर सिंहचा ‘सर्कस’, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, कंगना रनौतचे 2019 नंतर आलेले सगळेच सिनेमे सुपरहिट झाले असते, कारण यशाचे जुनेपुराणे सगळे ठोकताळे या सिनेमात ठासून भरलेले होते) तर प्रेक्षकांना स्टोरी आणि स्टोरी टेलिंगमध्येही विविधता हवी होती. याच कारणामुळे प्रेक्षकांना साऊथच्या डब्ड सिनेमांनी भूरळ पाडली. साऊथचे सिनेमे त्यांची कथानकं त्यांचं हिरोइझम प्रेक्षकांना आवडायला लागलं.

पण, हे अगदी कोव्हिडनंतरच झालं होतं अशातला काही भाग नाही. याची सुरूवात अगदी नव्वदच्या दशकात किंवा त्याहीआधी झाली होती. नव्वदच्या दशकात एकीकडे संजय दत्तचं ‘तम्मातम्मा’ गाणं गाजत होतं तर दुसरीकडे राम गोपाल वर्माचा हिंदी डब्ड ‘शिवा’ कॉलेजच्या पोरांना भुरळ पाडत होता. सायकलची चेन हातानं तोडून कॉलेजमधल्या गुंडांची धुलाई करणारा नागार्जून रातोरात स्टार झाला होता. ‘थानेदार’ सिनेमा थिएटरमधून उतरला तरीही शिवा सिनेमाची क्रेझ कमी होत नव्हती. रामूला बॉलिवूड खुणावत होतंच पण त्याला हवी तशी संधी मिळत नव्हती. ‘रूप की रानी चोरों का राजा’मुळे कर्जात बुडालेल्या बोनी कपूरला ‘क्वीक मनी’ची गरज होती, त्यामुळे अगदी काही दिवसांत (त्याकाळात सिनेमे काही महिन्यांत किंवा वर्षात बनत असत) रामूनं त्याचा पहिला हॉररपट बनवला ‘रात’! रेवती आणि ओम पुरीच्या स्टारर या सिनेमानं त्याकाळात बोनीला जबरदस्त कमाई करून दिली. त्यामुळे बोनीचा रामूवर विश्वास बसला त्यानंतर बोनीनं रामूसाठी ‘कंपनी’ची निर्मिती केली जो सुपरहिट ठरला. मात्र, अजूनही दक्षिणेकडच्या डिरेक्टर्सनी बॉलिवूडला पूर्ण झाकोळून टाकायचं बाकी होतं, त्याचं कारण म्हणजे प्रेक्षकांवर अजून ‘डेली-सोप्स’चा आणि हिंदी सिनेमाच्या डिरेक्टर्सचा बऱ्यापैकी प्रभाव बाकी होता आणि नंतर नंतर रामूनं जी माती खायला सुरूवात केली त्यामुळे तो पूर्ण बाहेर फेकला गेला. तर त्याच काळात मणीरत्नमनं एकाहून एक सरस सिनेमे दिले मात्र, अख्खं बॉलिवुड कब्जात घ्यायचं स्वप्न त्यानंही पाहिलं नव्हतं, जे आजच्या साऊथच्या सिनेमांनी पाहिलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणायला सुरूवात केली ती एका मोठ्या सिनेमानं… वादळरूपी आलेल्या या सिनेमानं बॉलिवुडच्या यशाच्या समीकरणांची-ठोकताळ्यांची उभी-आडवी चीरफाड केली, तो सिनेमा होता बाहुबली! बाहुबलीनं अनेक विक्रम रचले, त्याची पुनुरुक्ती इथे पुन्हा नको. पण, आता इथून पुढची बॉलिवुडची वाटचाल मळलेल्या वाटेवरून होणार नाही हे स्पष्ट झालं होतं, शाहरुखचा ‘जब हॅरी मेट सेजल’, सलमानचा ‘ट्यूबलाईट’ आणि करण जोहरचा ‘कलंक’ फ्लॉप झाल्यावर तर त्यावर शिक्कामोर्तब झालं.

मात्र, त्याच काळात बॉलिवुडमधल्या काही ‘हुशार हीरों’नी बदलत्या वाऱ्याच्या अंदाज घेऊन साऊथच्या सिनेमांचं रिमेक करायला सुरूवात केली होती, पहिला हिट मिळाला सलमान खानला ‘तेरे नाम’च्या रुपानं, त्यानंतर वाँटेड, रेडी, बॉडीगार्ड वगैरे वगैरेंनी सलमानच्या करिअरची गाडी रुळावर आणली. अक्षय कुमारही मागे राहीला नाही, हॉलीडे, राऊडी राठौड सारखे सुपरहिट सिनेमे हे साऊथच्या सिनेमांची रिमेक होते, या सगळ्यांच्याआधी मिस्टर परफेक्शनिस्टनं ‘गझनी’च्या माध्यमातून बॉलिवुडला शंभर कोटींचा गल्ला जमवणारा पहिला सिनेमा दिला. अजय देवगणनंही रोहित शेट्टीला हाताशी धरून ‘सिंघम’सारखे हिट सिनेमे दिले. दृश्यमच्या दोन्ही भागांनी अजयच्या करियरला बूस्ट दिला. ‘भोला’नंही बऱ्यापैकी गल्ला जमवला. ऐंशी नव्वदच्या काळातही साऊथच्या सिनेमांवरून हिंदी सिनेमे बनवण्यात आले होते, अनिल कपूरचा नायक हा त्यापैकीच एक, मात्र, त्याआधीचे ‘विरासत’, ‘ईश्वर’ सारखे सिनेमे फार चालले नाहीत. तर, फिरोज खाननंही कमल हसनच्या ‘नायकन’वरून ‘दयावान’ बनवला होता, मात्र, सिनेमा गाजला तो माधुरी दीक्षित आणि विनोद खन्नाच्या चुंबनदृश्यामुळे!

पण, आताच्या प्रेक्षकांना साऊथच्या सुपरहिट सिनेमांचा रिमेक नकोय त्यांना हवंय ओरिजनल! त्यामुळे ‘केजीएफ’ आणि ‘पुष्पा’ या दोन्ही सिनेमांनी जबरदस्त कमाई करत बॉलिवुडच्या हिरोंच्या साम्राज्याला हादरे दिले. या दोन्ही सिनेमांबाबत एक महत्त्वाचं निरीक्षण, साधारणतः सिनेमा थिएटरमधून उतरला कि तो आधी ओटीटीवर आणि त्यानंतर चॅनलवर उपलब्ध होतो. मात्र, हे दोन्ही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्यानंतरही मुंबईतल्या अनेक थिएटर्समध्ये गर्दी खेचत होते. तसंच या दोन्ही सिनेमांच्या पायरेटेड कॉपीज्‌‍ ठिगानं सगळीकडे उपलब्ध होत्या, तरीही थिएटरमधून दोन्ही सिनेमे उतरले नाहीत. याचं श्रेय कंटेट आणि स्टोरी टेलिंगलाच द्यायला हवं. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन पाहिले. शाहरुखच्या डचमळत्या करिअरला बॉयकॉटचा फतवा काढणाऱ्या सोशल मीडिया ट्रोल्सनीं संजीवनी दिली आणि पठाण हिट झाला, मात्र, शाहरुखनं यशाची चव चाखली ती जवानच्या माध्यमातून आणि त्याचा डिरेक्टरही साऊथचा एटलीच! शाहीद कपूरच्या करिअरला ‘कबीर सिंग’नं नव्यानं उभारी दिली. अत्यंत होतकरू शाहीदला फार काही चांगले रोल्स मिळालेच नाहीत, ‘डिरेक्टर्स एक्टर’ असलेल्या शाहीदला कबीर सिंगनं अच्छे दिन आणले. आता तेच अच्छे दिन रणबीर कपूर ॲनिमलच्या निमित्तानं उपभोगतोय, आणि दोन्ही सिनेमांचा डिरेक्टर एकच संदीप रेड्डी वानगा! कबीर सिंग, केजीएफ, पुष्पा आणि आता ॲनिमल बॉलिवुडला स्पर्धेत टिकून राहायचं असेल आता स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करतजुन्या ठोकताळ्यांमधून बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही, अन्यथा पुढच्या सिनेमामध्ये अल्लू अर्जून, प्रभास, यश असे हिरो दिसतील आणि हिंदी किंवा मराठी एक्टर्स हे त्यांचा आवाज त्यांना डबिंगसाठी देण्यापुरतेच उरतील!

- लेखक प्लॅनेट मराठी ओटीटी येथे क्रियेटीव्ह हेड म्हणून कार्यरत आहेत.
Exit mobile version