रूग्णांसह नातेवाईकांच्या वेळेची बचत
। रायगड । प्रतिनिधी ।
दवाखान्यात केस पेपर काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहवे लागते. केस पेपर काढूनदेखील डॉक्टर जागेवर भेटण्याबाबत कायमच ओरड राहिली आहे. मात्र आता केस पेपर काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याला ब्रेक लागणार आहे. घरबसल्या मोबाईलद्वारे केस पेपरची नोंदणी अॅपमार्फत केली जाणार आहे. आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अभियानांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुुरू करण्यात आली आहे.
रुग्णालयातील आभा विशेष कक्षातून रुग्णांना थेट केस पेपर एका क्लीक मिळणार आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या अख्यतारित, सहा उपजिल्हा रुग्णालय व आठ ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णांमार्फत रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जाते. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्यांची संख्या प्रचंड आहे. जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्ण बाह्य रुग्ण कक्षात उपचारासाठी येतात. बाह्य रुग्ण कक्षात उपचारासाठी दिवसाला एक हजार पर्यंतच्या रुग्णांची नोंद केली जाते. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा रुग्णालयात गर्दी होते.
रुग्णांना वेळेवर केस पेपर मिळावे यासाठी पुरुष, महिला ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग अशा वेगवेगळ्या स्वरुपाच्या खिडक्या तयार करण्यात आल्या आहेत.खिडक्यांमार्फत रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केस पेपरसाठी येणार्या रुग्णांचे नाव, पत्ता, वय, आजार अशी वेगवेगळी माहिती घेऊन संगणकामध्ये नोंद केली जाते. त्यानंतर त्यांना केस पेपर दिला जाते. ही प्रक्रिया लांबलचक असल्याने अनेक वेळा रुग्णांना उपचाराविनादेखील घरी परत जावे लागते. केस पेपर मिळविण्यासाठी तासनतास उभे राहण्याची वेळ रुग्णांवर येते. परंतु रुग्णांची ही समस्या आता लवकरच कायमची सुटण्याची शक्यता आहे. आयुष्यमान भारत डिजीटल हेल्थ मिशन अभियानांतर्गत मोबाईलच्या एका क्लीकवर घरबसल्या केस पेपरची नोंदणी रुग्णांना करता येणार आहे. त्यासाठी प्ले स्टोरमधून आभा नावाचे अॅप डाऊन लोड करणे आवश्यक आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यावर प्ले स्टोरमधून आभा अॅप डाऊन लोड करणे. मोबाईल नंबरने रजिस्टर करणे. क्यू आर स्कॅन करणे, टोकन नंबर मिळविणे. त्यानंतर टोकन नंबर दाखवून केस पेपर रुग्णालयातून घेणे ही प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आभा विशेष कक्षातून केस पेपर देण्याची व्यवस्था केली आहे. अॅप डाऊनलोड केल्यावर मोबाईल नंबर अधार लिंक असल्यास रुग्णांची माहिती उपलब्ध होईल. त्यासाठी मोबाईल अधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
केसपेपर घेण्याची प्रक्रिया
प्ले स्टोरमधून आभा अॅप डाऊनलोड करणे, मोबाईल नंबरने रजिस्टर करणे, क्यूआर स्कॅन करणे, टोकन मिळणे, त्यानंतर टोकन नंबर दाखवून केस पेपर घेणे.