भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली अन् देशभरात एकच जल्लोष झाला. तमाम भारतीयांच्या अभिमानाचा क्षण रायगड जिल्ह्यातही पेढे वाटून, फटाके फोडून, ढोल-ताशे वाजवत मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांना लाईव्ह प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी जिल्हाभरात अनेक ठिकाणी मोठ मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. दरम्यान, चांद्रयान चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या सर्वांनीच टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. अनेकांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.
फटाके फोडून जल्लोष
तळा, वार्ताहर
चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केल्यानंतर तळा शहरात नागरिकांनी एकच जल्लोष केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. हा अभिमानाचा क्षण साजरा करण्यासाठी तळा शहरवासी शहरातील बळीचा नाका येथे बुधवारी मोठ्या संख्येने जमले होते.
सायंकाळी चांद्रयान-3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झालं आणि तळा शहरवासियांनी शहरातील बळीचा नाका येथे खालुबाजा वाजवत फटाके फोडून एकच जल्लोष केला. यावेळी बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, विविध पक्षाचे राजकीय नेते व नागरिकांनी एकत्र येऊन एकमेकांना पेढा भरवत आपला आनंदोत्सव साजरा केला. तसेच आपल्या देशाप्रती जयघोषाच्या घोषणा देऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या भारतीय वैज्ञानिकांबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक रितेश मुंढे, नगरसेवक मंगेश शिगवण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम कजबजे यांसह तळा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोपाड्यात भारत मातेचा जयजयकार
रसायनी, वार्ताहर
चंद्रावर उतरणारा भारत देश जरी चौथा असला, तरी दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश आहे. बुधवारी सायंकाळी चांद्रयान भारतात परतल्यानंतर भारतीयांना खूपच आनंद झाला. अखंड भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याने ठिकठिकाणी दिवाळी साजरी झाल्यासारखे चित्र पहावयास मिळाले. चंद्रावर उतरुन भारताने इतिहास घडविला असून, सर्वत्र जल्लोष करण्यात आला. रसायनीतील बजरंग दलाच्या जवानांनी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून मोहोपाडा मुख्य बाजारपेठ ते प्रवेशद्वार अशी हातात तिरंगा घेऊन जवानांनी रॅली काढली. यावेळी ‘भारत माता की जय, जय श्री राम, वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी जवानांची रॅली मोहोपाडा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येताच ऐतिहासिक म्हणून भारत चंद्रावर पोहचल्याने आनंदोत्सव साजरा केला.
विरूपाक्ष महादेव मंदिरात महाआरती
पनवेल, वार्ताहर
चांद्रयान-3 च्या ‘ विक्रम ‘चे चंद्रावर यशस्वी अवतरण होताच संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण संचारले आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली. चांद्रयान-3 विक्रमचे यशस्वी अवतरण झाल्याची आनंदाची वार्ता कानी पडताच पनवेल येथील विरूपाक्ष महादेव मंदिरात विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महादेवासमोर आरती करून भक्ती भावनेने उत्साह आणि जल्लोष साजरा केला. त्यानंतर चांद्रयान-3 च्या यशासाठी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
इस्रोच्या चांद्रयान -3 मोहिमेचा चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरणाचा दुर्मिळ क्षण अनेक नागरिक समाज माध्यमासह दूरचित्रवाणीवर पाहत होते. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पनवेलमधील श्री. विरूपाक्ष महादेव मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला आनंद साजरा केला.
माणगावात फटाक्यांची आतषबाजी
माणगाव, प्रतिनिधी
चांद्रयान-3 यशस्वी करून भारताने बुधवारी चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडविल्याने याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी माणगावमधील तरुणांनी एकत्रित येत जल्लोष केला. माणगावमधील तरुणांनी बसस्थानक माणगावसमोर मुंबई-गोवा महामार्गावर एकत्रित येत फटाक्यांच्या आतषबाजीत हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ असा नारा देऊन साजरा केला. यावेळी युवानेते विपुल उभारे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, शिंदे गटाचे जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, परेश सांगले, वैभव मोरे, स्वप्नील सकपाळ, राजू सुतार, नयन पोटले, श्रीराम कळंबे, ललित ओसवाल, मंदार मढवी आदी देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.