शिवजयंतीवरुन सत्ताधारी, विरोधक आमनेसामने

| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सोमवारी (21 मार्च) तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असतानाच विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरूनही वाद रंगताना दिसला. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. शिवजयंती ही तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार हा मुद्दा उपस्थित करीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबई विमानतळाच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. तर राज्य सरकारने यापूर्वीच शिवजयंती साजरी केली आहे. त्यामुळे शिवजयंती कधी साजरी करायची, यावर सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रश्‍नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आमचे सरकार येण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्षे अर्थमंत्री म्हणून काम केले. पाच वर्षे मी सभागृहात येत होतो. त्यावेळेस सभागृहात तिथीनुसार शिवजंयती साजरी झाली नाही किंवा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला गेला नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आताही शिवजयंतीवरून वाद होता कामा नये. उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. दिवंगत नेते रामकृष्ण मोरे मंत्री असताना शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाल्याची नोंद करण्यात आली. तेव्हापासून हीच तारीख प्रमाण मानून या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर जातात. ही प्रथा आजही कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसही तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करते. पण तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल तर तो अधिकार प्रत्येक नेत्याला, आमदाराला आणि खासदाराला आहे. कारण नसताना या मुद्द्यावरून चर्चा होता कामा नये.

अजित पवार, उपमुख्यमंत्री
Exit mobile version