शेकापच्या 74 व्या वर्धापनदिनी गावागावात फडकणार लाल बावटा

नियमांचे पालन करुन करणार साधेपणाने साजरा
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असा साजरा केला जाणार नसला तरी 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गावागावात शेकापक्षाचे नेते आणि कार्यकर्ते लाल बावटा दिमाखात फडकावून मानवंदना देणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधेपणाने आणि सर्व शासकीय नियमांचे पालन करुनच वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी दिमाखदारपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी येणारा शेकापक्षाचा 74 वा वर्धापनदिन यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे सामाजिक भान राखून दरवर्षीच्या परंपरेनुसार करण्याऐवजी सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक गावात नियमांचे पालन करुनच साजरा करण्याचा निर्णय शेकापने घेतला आहे. यादिवशी शेकाप कार्यालयात, तसेच गावागावात आणि तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या सर्व निमयांचे पालन करुनच सकाळी 10 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी दिली.
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे डाव्या विचारांच्या पुरोगामी कार्यकर्त्यांचा उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी रायगड जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणावर साजर्‍या केल्या जाणार्‍या वर्धापनदिनी अनेक डावे विचारांचे विचारवंत नेेते एकत्र येत एक वेगळा विचार महाराष्ट्राला देत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या वर्धापनदिनाकडे लागलेले असते. शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजर्‍या केल्या जाणार्‍या या वर्धापनदिनी शेकापचे रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांबरोबरच महाराष्ट्रातील डाव्या विचारांचे कार्यकर्तेदेखील हजेरी लावत असतात.
मात्र, 2020 सालापासून कोरोनाचे संकट संपूर्ण जगभरात आहे. देशात आणि महाराष्ट्रात त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातदेखील कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे यावर्षी शेकापचा 74 वा वर्धापन साजरा करताना तो मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य स्वरुपात साजरा न करता सोमवार, दि. 2 ऑगस्ट रोजी साध्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाच्या तालुका चिटणीसांनी वर्धापनदिन आपापल्या तालुक्यात पक्ष कार्यालयात शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन सकाळी 10 वाजता प्राथमिक स्वरुपात ध्वजवंदन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामपंचायती स्तरावर शासनाचे सर्व नियम पाळून झेंडावंदन करण्याचे आवाहन जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version