आले रे आले गद्दार आले! पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ गदारोळाने झाला. पहिल्याच दिवशी विरोधी मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्‍यावर बसून गद्दार आले रे आले, गद्दार आले अशी जोरदार घोषणाबाजी करीत सत्ताधार्‍यांना डिवचले.

‘ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा,’ ‘ईडी सरकार हाय हाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,’ ‘आले रे आले 50 खोके आले, खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, स्थगिती सरकार हाय हाय’…’महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी,’….अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडून शिंदे -फडणवीस सरकारच्या विरोधात आक्रमकपणे घोषणा दिल्या.

आ.धनंजय मुंडे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहून दिलेल्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले. मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी ‘सुधीर भाऊंना कमी दर्जाचे खात देणार्‍या सरकारचा धिक्कार असो,’ अशी घोषणा देत उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच ‘संजय शिरसाठ याना मंत्रिपद न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो.’ ‘आशिष शेलार याना मंत्रिमंडळात स्थान न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देत विधानभवन दणाणून सोडले.

विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणा देणार्‍यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर यावेळी झळकावण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांचीही टीका
अशाप्रकारे एखादं ट्वीट करुन विरोधी पक्षाला बदनाम कऱण्याचा आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं धोरण आहे. पण विरोधी पक्ष अशा कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. महाविकास आघाडी एकजुटीने शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

मी काही राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना याचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून, महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही. जनतेला धमकावणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील, तर यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो.

आदित्य ठाकरे,शिवसेना नेते
Exit mobile version