साथीच्या आजाराची भीती; कचरा उचलला न गेल्याने परिसरात दुर्गंधी
| खोपोली | वार्ताहर |
खोपोली शहरातील नागरी वसाहतीजवळील रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत काही बाहेरील लोक रस्त्याच्या बाजूला कचरा टाकत असल्याचा आरोप अनेकदा करण्यात आला आहे. हा कचरा पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून वेळीच उचलला न गेल्याने परिसरात दुर्गंधी पसरून साथीच्या आजाराला आमंत्रण देण्यात येत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खोपोली पालिकेतील दैनंदिन कामकाज व कारभाराबाबतीत नागरिकांमध्ये कमालीची नाराजी आहे. नगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे पूर्णपणे प्रशासकीय व अन्य कारभार मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या एकतर्फी हातात असल्याने त्याचा प्रत्यय कर्मचारी वर्गासह नागरिकांना अनेकदा अनुभवायला आला आहे. तशी चर्चा पालिका कार्यालय व सर्वच स्तरावर ऐकायला मिळत आहे. रेल्वे स्थानकाकडून बहिरी मंदिरापासून बाजारपेठेला जोडणारा रस्ता कायमच कचऱ्याने व्यापला जात असून, या रस्त्यावर साचलेला कचरा वेळेत उचलला न गेल्याने तो पावसात कुजून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने येथील तसेच या रस्त्याने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे पालिका प्रशासनाविरोधात सर्वत्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हा रस्ता कायमस्वरूपी कचरामुक्त व्हावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
खोपोली नगरपालिकेचे लोकांच्या आरोग्याकडे लक्ष नसल्याचे अनेक गोष्टींमधून दिसून येते. भाजी मार्केटमध्ये मच्छी मार्केटचे पाणी येत आहे. त्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भाजी मार्केटमध्ये कोणीही जात नाही आणि कोणी गेलेच तर त्याला त्या दुर्गंधीयुक्त पाण्यापासून तयार झालेल्या चिखलातूनच अख्खे भाजी मार्केट पायदळी तुडवावे लागते. तसाच प्रकार शहराच्या सर्वच रस्त्यांच्या बाबतीत दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरण्यास सुरूवात झाली आहे. याकडे खोपोली नगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अन्यथा साथीचे आजार पसरले जाऊ शकतात.
दिलीप पवार, खोपोली