महालक्ष्मीच्या दरबारात डबलबारीचा सामना

बागमळा येथे रविवारी भजनांचे आयोजन
| चौल | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सवानिमित्त बागमळा येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जागर सुरु आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रविवार, दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता याठिकाणी डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनंत लक्ष्मण घरत यांनी दिली.

बागमळा येथील महालक्ष्मी एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी असा महालक्ष्मीचा महिमा असून, तिच्यावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. नवरात्र, मार्गशीर्ष महिन्यासह इतर वारीसुद्धा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कायम गर्दी दिसून येते. चौलमळा येथील अनंत घरत हे महालक्ष्मीचे भक्त असून, त्यांची देवीवर अपार श्रद्धा आहे. दरवर्षी देवीच्या मंदिरात डबलबारी भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन ते नवरात्रोत्सवाला रंगत आणत असतात. यावर्षीसुद्धा डबलबारी भजनाचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

श्री कृष्णादेवी प्रासादिक मंडळ, चौलमळा गुरुवर्य संगीतरत्न शंखुनाथ पडघेकर (पनवेल) यांचे शिष्य बुवा चंद्रकांत नवगावकर यांना वादनकार म्हणून प्रथमेश पाथरे (कुरुळ), अजय वाडकर (चौलमळा) हे साथ करणार आहेत. या मंडळाची धुरा व्यवस्थापक अल्पेश म्हात्रे समर्थपणे पार पाडत आहेत. तर, श्री राम प्रासादिक भजन मंडळ, मापगावचे बुवा नितीन पाटील (बामणसुरे) यांना पखवाजवादक म्हणून ॠषीकेश झावरे (भिलजी), निलेश राऊत (मापगाव) साथसंगत करणार आहेत, अशी माहिती अनंत घरत यांनी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागमळा, चौलमळा मित्रमंडळ मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त भजनप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version