| अलिबाग | प्रतिनिधी |
शहाबाज ग्रामपंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने इंडिया आघाडीच्यावतीने प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. रॅली, प्रचारामध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सामील होत असल्याने शहाबाजमध्य इंडिया आघाडीचे पारडं जड असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मतदारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे विरोधक धास्तावून गेल्याची चर्चाही जोर धरत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीमार्फत थेट सरपंचपदासाठी डॉ. केतकी सतिश तरे, प्रभाग एकमधून सदस्यपदासाठी रुचिता रणजीत चोरगे, समीर अरविंद पाटील, संदेश लक्ष्मण बैकर, प्रभाग दोनमधून प्रवीण प्रभाकर पाटील, अश्वीनी प्रसाद पाटील, सुवर्णा हिराजी पाटील, प्रभाग तीनमध्ये सोनल अक्षय म्हात्रे, समीर पांडुरंग भोईर, प्रभाग क्रमांक चारमध्ये भुपेंद्र जनार्दन पाटील संगिता सुधीर म्हात्रे, स्वाती योगेंद्र जुईकर या उमेदवार उभ्या राहिल्या आहेत. शहाबाजमध्ये केलेल्या विकास कामांमुळे प्रचारातून इंडिया आघाडीच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
इंडिया आघाडीच्यावतीने नुकतीच प्रचार रॅली काढण्यात आली. मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीसह प्रत्यक्ष भेटीला उत्तम प्रतिसाद मतदारांकडून मिळाला. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सामील झाले होते. एक वेगळा उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये संचारला होता.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या चित्रा पाटील, काँग्रेसचे ॲड. प्रवीण ठाकूर, उध्दव ठाकरे गटातील शिवसेनेचे तालुका प्रमुख शंकर गुरव, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील (बाळूशेट), माजी सरपंच सतिश तरे, नरेश म्हात्रे, भारत बैकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारांसह कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे आतापासून इंडिया आघाडीचे पारडं जड असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
शहाबाज ग्रामपंचायत हद्दीत शहाबाज, चौकीचापाडा – वालवडे, कमळपाडा, घसवड ही गावे, वाड्या, पाड्यांचा समावेश असून तीन हजार पाचशे मतदार येथे आहेत. प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत.5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा वेगही वाढला आहे.